| |
50 व्या विवाह वर्धापन दिनानिमित्त मनोगत
आज आमच्या लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी (50व्या) वर्धापनदिनानिमित्त आपण सर्वजण जमला आहात आपणासमोर मी माझे मनोगत मांडणार आहे. वयाची वैयक्तिक साठी गाठणे, पंचाहत्तरी गाठणे हा एक विक्रमच असतो कारण आपण कितीही प्रयत्न केले,आहार विहार सांभाळला तरीही जगणे निव्वळ आपल्या हातांत कधीच
नसते तर ते मृत्युच्या हातात असते, त्या मृत्युवर मात करुन जास्त वयाचे शिखर गांठणे,
हा एक चमत्कारच असतो. जन्मापासुन आधि-व्याधि, जबर अपघात, दुर्दैवी खून, या
विविध माध्यमातुन तो यम आपल्याला संपवण्याच्या मागे असतो. तेव्हा या अत्युच्च
शिखरापर्यंत पोचण्यामागे ईश्वरी कृपा, ईश्वरी हात असतो हे नक्की. हे झाले वैयक्तिक
विक्रमाबद्दल.
वयात आल्यावर आपले लग्न होते. विवाहानंतर संसारामध्ये एक जोडीदारीण येते. यशस्वी
संसार हा दोघांनी मिळुन करायचा एक व्यवसाय असतो. मुले-बाळे होणे हे त्यावरचे व्याज
असते व ती चांगली निपजणे, ती पुढे आपापल्या जीवनांत रमणे, त्यांचा संसार फळाफुलांनी
बहरणे हा या व्यवसायात मिळालेला बोनस असतो.
एकट्याने या मॅरॅथॉन रेसमध्ये टिकणं व पहिले येणं जिथे अवघड, तिथे अर्धांगाने,
अर्धांगीनीसह ही थ्री लेगेड रेस म्हणजे तीनपायांची शर्यत पळणे आणि जिंकणे हे ईश्वरी
प्रसादाविना, वा चमत्काराशिवाय शक्यच नाही.
आम्ही ही रेस धांवत असतांना कितीतरी संकटांतुन गेलो आहोत. पण आम्हां उभयातांना
गुरुबळ चांगले आहे आणि आमच्या घराण्यावर राजाधिराज योगिराज अक्कलकोटच्या श्री
स्वामी समर्थमहाराजांची असीम कृपा आहे आणि आता तर त्यांनी आम्हाला श्रीराम जयराम
जयजयराम हे कवच पांघरायला दिले आहे. त्यांच्या कृपेने मी भिडेकुलवंशीयांकडुन साडे
तीन कोटी श्रीराम नाम संकल्प पुरा करवुन घेऊ शकलो. आणि आता त्याच्याच प्रेरणेने
हितचिंतक व नातलगांच्या सहाय्याने 13 कोटींचा संकल्प सोडला आहे आणि केवळ 20
महिन्यांतच आम्ही 3 कोटींपर्यंत येउन पोचलो आहोत. केवळ त्यांच्या कृपेनेच आम्ही
इथवर, या वयापर्यंत येउन पोचलो आहोत. स्वामी समर्थांच्यावर केलेल्या एका स्तोत्रात
म्हटलेलेच आहे “जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,स्वये भक्त प्रारब्ध घडवि ही माय”
आणि माझ्या दृष्टीने त्यांचे हे आशीर्वचन सार्थ ठरले आहे. माणसांवर संकटे ही प्रारब्धाने
येणारच पण संकटांनी डगमगुन न जाता जो त्यांच्यावर विश्वास ठेवुन जो आपले पाय
भूमीवर घट्ट रोवून उभा रहातो त्याच्याबरोबर स्वामी समर्थ सदैव असतात व त्याचे रक्षण
करत मागेही असतात. पण पाठीमागे असल्यामुळे ते आपल्याला कधिही दिसत नाहीत.
पिल्लांना जरी दिसत नसले तरीही घार आकाशांत उडत असली तरी तिचे पिल्लांवर लक्ष
असते त्यांच्याच कृपेने आम्ही हा सुवर्णदिन पाहिला. त्याबद्दल आम्ही त्यांचे शतश: ऋणी
आहोत.
कुठल्याही व्यक्तिच्या आयुष्यात साठी, पंचाहत्तरी वैयक्तिकरित्या गाठणे हा नकळत घडुन
गेलेला विक्रम असतो. तसाच दोघांच्या विवाहाचा 50 वा वर्धापन दिन साजरा करता येणे
हाही एक दुर्मिळ, दुर्लभ, असंभव असा विक्रम आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत वयाने
77 आणि 70 वर्षांचे आहोत, प्रकृतीही चांगली आहे, दोघेही विना काठी चालु शकतो, वाचु
शकतो, पाहु शकतो, स्पष्ट बोलु शकतो, ऎकु शकतो ही आमच्यावर केवढी ईश्वरी कृपा आहे.
प्रकृती व्यवस्थित असतांना गाठलेले आयुष्यातील हे हिमालयाचे सर्वोच्च कांचनगंगा शिखर
आहे आणि आम्ही दोघांनी एकत्रपणे ते पादाक्रांत केले आहे विवाहाचा 60 वा किंवा 75 वा
वर्धापन दिन म्हणजे शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे “अंगं गलितं मुंडं गलितं” असा
असणारा. साजरा करण्यात काय मजा असणार. असं नाममात्र असण्यापेक्षा नसलेलेच बरे.
नुसत्या वयाने आम्ही वाढलेले असु वर गेलेलो नाही म्हणुन शरीराने असु पण जगण्याची
उमेद संपलेली असेल,कदाचित परावलंबित्व आलेले असेल आणि सोडव रे बाबा अशी
प्रार्थनेची वेळ येण्यापेक्षा त्या आधीच गेलेले सर्वांच्या दृष्टीनेच बरे असते.
नातवंडांनी, सुनेने, मुलीने आमचे पुन्हा लग्न लावले. याचे कारण त्यानी सांगितले कि
तुम्ही लग्न केलेत, तेव्हा आम्हाला बोलावले नाहीत, आम्ही ते पाहिलेले नाही, आम्हाला ते
पहायचे आहे. गोष्ट एकदम सही होती म्हणुन आम्ही होकार दिला. एकंदरीने मजा आली.
आणि तुम्हा सर्वांनाही ती लुटता आली.
संगीत शारदा नाटकात एक गाणे आहे “म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान” त्या
वृद्धाचे वय 75 होते, माझे तर 77 आहे. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी
संसाराच्या ओझ्याने पिचलेले, दबलेले संसारीजन अकाली वृद्ध व्हायचे, दिसायचे. माझ्याकडे
बघा वाटतो कां मी 77 वर्षांचा. केस पांढरे आहेत. अहो हल्ली जवान मुलांचे केसही पांढरे
असतात म्हणुन त्यांना कुणी म्हातारे म्हणत नाही. त्या मुलांसारखाच मी आणी आमची
हीही चिरतरुण आहे. अंकांची बेरीज करुन बघ, सात + सात म्हणजे 14 होतात आणि 7
+ 0 म्हणजे 7 होतात म्हणजे आहोत की नाही आम्ही तरुण, तरुण कसले आम्ही बाळेच
आहोत. म्हणजे हा बालविवाहच आहे. पूर्वी बालविवाह होतच असत. वृद्धपण हे दुसरे
बाळपणच असतं. सर्वांच्या आग्रहास्तव आम्ही आज पुन्हा बाळे झालो आहोत. आणि घरचे
जे कांही करायला सांगतील त्याला हो म्हणत आहोत.
आम्ही या शिखरापर्यंत पोचलो त्यात मघाशी मी म्हणालो त्याप्रमाणे आमचा खास काहीही
प्रयत्न् नाही. जन्मलो त्याला दुसरेच कारणीभूत होते तसेच आम्हाला किंवा कुणालाही
नकळत वाढतावाढता मी 77 चा आणि ती 70 ची झाली,
निवडणुकीला उमेदवार उभा असतो, तो निवडुनही येतो. कारण त्यामागे असंख्य कार्यकर्ते
असतात व मतदान करणारे अदृश्य लाखो हात असतात तसे आम्ही हे शिखर गांठले
त्यामागे घरातील कुटुंबीय,निकटचे नातलग व असंख्य हितचिंतक यांचा हात आहे.श्रीकृष्णाने
गोवर्धन पर्वत उचलला पण त्याला त्याच्या सवंगड्यांची मोलाची साथ होती. त्याप्रमाणेच
आम्ही इथवर हातीपायी धड व सुखरुप पोचलो त्यामागे या सर्वांचा मोठा सहभाग आहे
त्यांचे हे ऋण आम्हाला मान्य करायलाच हवे. एखादा रोगी जेव्हा आजारी असतो तेव्हा
त्याची शुश्रुषा करणार्यांच्या सहनशीलतेची खरी सत्वपरिक्षा असते, कसोटी असते.
घरातल्यांनी आणि निकटच्या नातलगानी काय काय सोसले आहे याची मला पूर्ण जाणिव
आहे आभार परक्यांचे मनावयाचे असतात. हे तर आमचेच आहेत. आम्ही असे आमच्या
पायांवर ताठ सत्तरीतही उभे आहोत त्याचे श्रेय मी ह्या सर्वांना देतो.
या सोहळ्याला येताना कांहीही उपहार, म्हणजे भेट किंवा पुष्पगुच्छही आणु नये अशी
आम्ही सर्वांना विनंती केली होती याचे कारण म्हणजे जमलेल्या सर्वांकडुन मला भरभरुन
मिळालेले आहे. आपापल्या कुवतीप्रमाणे ज्याने त्याने कुणी मूठभर,कुणी पसाभर कुणी
ओंजळभर तर कुणी सूपभर तुम्ही आधीच दिले आहे. सर्वांना फार टेंशनमध्ये न ठेवता
तुम्ही मला काय दिले आहे ते मी सांगतो. मी आपणाकडे रामनामजपदान मागितले होते
आणि ते आपण मला नियमितपणे द्बेत आहात. कुठ्ल्याही भेटीपेक्षा ही भेट अनमोल आहे
आणि मला सांगावयाला आनंद होतो आहे की 13 कोटी पैकी 3 कोटी जप पुरा झाला आहे.
तेव्हा तुमच्याकडुन मी आधीच खूप घेतले आहे. म्हणुनच अहेर किंवा गुच्छ कृपया आणु
नये अशी मी विनंती केली होती. मी रामप्रभूंकडे काय मागितले होते ते ऎका:
श्रीरामप्रभूंकडे अडचणनिवारणीसाठी आम्ही केला विनतीअर्ज तरण्यासाठी हवे सहाय्य, तेरा
कोटी नामजपाचे मागितले कर्ज सुह्रुदनातलग सहकार्याने फेडु ऋण,तारण त्यासाठी ठेवले
प्राण
श्रीराम जयराम जयराम जप आनंददायी,पुण्यप्रद लाभली खाण
मला चारोळ्या करायचा छंद आहे. तेव्हा एक समर्पक चारोळीने मी हे माझे मनोगत
संपवणार आहे. ह्या वयापर्यंत त्याने आम्हाला जीवन दिले, आपण वेळात वेळ काढून ह्या
सोहळ्यात सहभागी झालात आणि आमचा आनंद आपण द्विगुणित केलात याबद्दल आभार
मानायला माझ्याजवळ शब्दच नाहीत. केवळ एकच शब्द उच्चारतो “ धन्यवाद”.
चारोळी अशी आहे: मी 77 चा झालो, ती 70 ची झाली
यासाठी आम्ही स्वत:हून काय केले
संसारसागरात नौका लोटली गेलो पुढे
जे कांही घडले ते आधीच असणार ठरलेले
वादळे मनोगत आली,गेली,येथपर्यंत सुखरूप पोचलो कारण एकच त्याने अवचित नाही नेले
होती स्वामीकृपा,बळकट होती आयुष्यरेषा, परमेश्वर कृपेनेच सर्व कांही झाले भले.
वासुदेव भिडे दिनांक – 24/05/09 सर्वोदय धारा, पाथर्ली. डोंबिवली. (पूर्व) |
|
|