| |
गीत शिवछत्रपति यातील गीत क्र. 41/82
घ्यावया हवी उंच नभात भव्य गरुडझेंप
संधि हुकली तर अशक्य मिळणे पुन्हा पुढ्ची खेप धृ.
शिकार करण्या टेप लांडगा हा आलमगीर
त्वरा कराया हवी सुटावया, मारील उशीर
विचारपूर्वक अविचार हवा,कुणी घेवो आक्षेप (1)
शठाशी व्हावे महाशठ धडा हा राजनीतीचा
जिवंत सुटणे,विचार नंतर नीती-अनीतीचा
चोराला फसवण्यात नसते काहीही पाप (2)
हालचाली नाही शुभसुचक, सुचवतात कांही
खुनशी आलमगीर कदापि विश्वसनीय नाही
दगलबाजीने पदरी टाकूया पुरेपूर माप (3)
संग असंगाशी ओढवला, प्रसंग हा बांका
क्लृप्ती योजण्या हवी अप्रतिम व्हावयास सुटका
कुलदैवत अन आई ठेविल आम्हा सुखरुप (4)
नाही काळजी माझी, चिंता शंभूराजांची
वचन दिले येताना काळजी करु नका त्यांची
न्यावया हवा सहीसलामत परत राजदीप (5)
संकटात सापडता ईश्वर, एकच आधार
प्रयत्नांती परमेश्वर,ईश्वर दूर नसे फार
शुभेच्छा व आशीर्वचनानी येतसे हुरुप (6)
घ्यावया हवी उंच नभांत भव्य गरुडझेंप
संधि हुकली तर अशक्य मिळणे पुन्हा पुढची खेप धृ. |
|
|