|
गणेशस्तुती/गणेशवंदना
खेळ मांडिला आम्ही मजेचा, वंदन तुज गणपती
ये गणाधीशा गुणाधीशा,गणनायक विद्यापति
सांग गणेशा,सांग गुणेशा, नांवे तुज तरी किती ?
लंबोदर तू, एकदंत तू, विकट भालचंद्र
धूम्रवर्ण तू, सिद्धीविनायक,तूही गजवक्त्र
गौरीनंदन, शारदापति, शंकरसुत गणपती
सांग गणेशा,सांग गुणेशा, नांवे तुजला किती (1)
कार्यारंभी कोणत्याही तुज करती आवाहन
निर्विघ्नं कुरु,करून प्रार्थना,करती तव पूजन
अग्रपूजेचा सन्मान तुझा,पहिली तुझी आरती
सांग गणेशा, सांग गुणेशा, नांवे तुज किती किती (2)
सुरगणनायक, वरदविनायक,महाकाय गजमुख
महिमा गाजे त्रिभुवनात,जगास तुझी ओळख
पामर मी,सुर आणि शब्द दे,करावया तुझी स्तुति
सांग गणेशा, सांग गुणेशा, नांवे तुजला किती (3)
|