|
काश! असं झालं तर ?
मातृ-पितृ देवो भव
(घरामध्ये माधवचे सासु-सासरे बसले आहेत. संध्याकाळची वेळ आहे. माधव माधवी कामावरुन येतात)
सासुबाई : बसा, दमला असाल ना? पाणी आणते. गाडीला गर्दी असेल नाही.
माधवी : गर्दीचे कांही वाटत नाही. मुंबईकराला गर्दीचे भय वाटुन कसे चालेल, ती तर त्याच्या पाचवीला पुजलेली
आहे. कांही ना कांही कारणाने गाड्या लेट असतात. म्हणुन तर म्हण पडली आहे, रोज मरे त्याला कोण रडे. आज
काय ओव्हरहेडवायर तुटली, कुठे सिग्नल फेल झाले, उद्या आणखी काय, परवा आणखी काय.
माधव: मरे पुराण सांगावे तेव्हढे थोडेच आहे. बाबा, दोन बातम्या द्यायच्या आहेत. एक वाईट आहे तर दुसरी
चांगली आहे. कुठली आधी ऎकवु ?
सासरे: आधी वाईटच ऎकव. आधी आनंद नंतर दु:ख असे असू नये. दु:खानंतर लाभलेल्या आनंदाची चव कांही
वेगळीच असते.
सासुबाई : माधवी तू दु:खाची बातमी सांग आणि जावईबापु नंतर तुम्ही आनंदाची बातमी सांगा.
माधवी: वाईट बातमी म्हणजे आमची बदली झाली आहे आणि तीही इथुन खूप दूर. आणि लगेच जॉईन व्हायचे
आहे. तुमच्या पासुन दूर, मुले आणि आम्ही तुमच्यापासुन दूर जाणार म्हणुन आम्ही दोघेही नर्व्हस आहोत.
सासरे: बदली असलेल्या संस्थेत नोकरी पत्करली आणि नोकरीत बदली झाली म्हणजे कांही नवीन नाही. खूप दूर
झाली आहे म्हणजे थोडा काळजीचा विषय आहे. बरं आम्ही हा शाँक पचवला. आता माधव तु आम्हाला आनंदाची
बातमी दे.म्हणजे त्या आनंदात आम्ही हे दु:ख विसरुन जाऊ.
माधव: अहो मला बढती मिळाली आहे वरच्या मॅनेजरच्या पोस्टवर आता मी बडा ऑफिसर होणार आहे. आम्ही
दोघेही एकाच संस्थेत काम करतो आहोत म्हणुन सोयीसाठी दोघांच्या बदलीची आँर्डर निघाली आहे.त्यामुळे
नवर-बायकोची फारकत होत नाही, मन:स्वास्थ्य व्यवस्थित रहाते आणि संस्थेचे कामही नीट चालते.
माधवी: आई बाबा पेढे घ्या. आईबाबा तुम्ही शॉक पचवुन बातमी ऎकली,आणि त्यात आनंदही मानला त्याबद्दल
आज आम्ही तुम्हाला पार्टी देणार आहोत.
माधव: आपण आज बाहेर कुठल्यातरी हॉटेलात जेवायला जाऊन बढतीचा आनंदोत्सव साजरा करुया.
सासरे: आनंदोत्सव साजरा करुया पण पार्टी आम्ही देऊ कबूल आहे का?
सासुबाई: न कबूल असायला काय झाले. म्हणजे त्यांना कळेल की बढतीचा आनंद आम्हालाही झाला आहे.
सासरे: आनंदोत्सव साजरा करुयाच. माधवला बढती मिळाली आहे याचा आम्हाला अभिमान आहे. त्याच्या हुषारीचे चीज झाले आणि त्यामानाने त्याला लौकर बढती मिळाली.
सासुबाई: पण आता नवीन अपरिचित ठिकाण, भाषेचा प्रश्न, अजुन मुले लहान आहेत, धड तशी लहान नाहीत, धड
मोठी नाहीत. इथे आम्ही दोघे त्यांना सांभाळायला होतो, त्यामुळे तुम्हाला दिवसभर काळजी नव्हती.
सासरे: हो ना, मुलांचीच काळजी वाटते. तुम्ही दोघेही ऑफिसात जाल. दिवसभर एवढ्या जबाबदारीने त्यांच्याकडे
कोण बघणार. त्यांना सर्वही नवीन आणि आम्हालाही दिवसभर त्यांच्याशिवाय करमणार नाही. आता वेळ
घालवण्यासाठी आम्हाला कांहीतरी उद्योग शोधायला हवा.
माधव: माधवी, माझ्या आईबाबांना बोलावुन घेउया का वरुन? मागे आई म्हणाली होती, केव्हाही हांक मारा अगदी
वरुनसुद्धा आम्ही धावत येऊ तुमच्यासाठी. तुझे लग्न झाले आणि आम्ही कदाचित हयात नसलो तर सूनबाईला
मदत करण्यासाठी नक्की येऊ, म्हणजे तिचे काम हलके होईल.
माधवी: सासुबाई असे म्हणाल्या होत्या हा त्यांचा मोठेपणा होता. त्यांना बघावयाची भेटावयाची मला संधि मिळाली
नाही हे माझे दुर्दैव.
सासुबाई : अरे, जिवंतपणी असे बोलणे ठीक आहे, यावरुन त्यांची तुमच्यावर किती माया होती हे कळते. पण तिथे
गेल्यावर परतीची वाट नाही. तुमचे लग्न होण्याआधीच त्या गेल्या त्यामुळे त्यांचा जीव इथेच घुटमळत असेल. पण तरीही हे शक्य नाही.
सासरे: मुले अजाण आहेत. थोडी नासमज आहेत. लाडात वाढली आहेत. वस्तू जागेवर ठेवणे माहित नाही. शोधायची संवय नाही आणि वयाप्रमाणे भांड भांड भांडत असतात.
माधवी: अगदी खरे आहे. तुम्ही त्यांची खूप काळजी घेत होतात. घरी हवे नको बघत होतात. तिथे तुम्ही असणार
नाही. कुणीतरी लक्ष ठेवणारे, दिवसभर रहाणारे शोधायला हवे, किंवा कुठेतरी पाळणाघरात ठेवायला हवे. सख्खी
माणसे जेवढी काळजी घेतात तेव्हढी काळजी पगारी लोक कुठुन घेणार? माधव: माधवी, तुला म्हण माहित आहे
ना, चोंच देतो तो चाराही देतो. तुझा देवावर, स्वामींवर विश्वास आहे ना, ते सदैव आपल्या पाठीशी असतात. तेच
आपला हा प्रश्न सोडवतील.
(2)
( माधव-माधवी गप्पा मारत बसलेले असतात. बाजुलाच सासरे पेपर वाचत आणि सासुबाईही कांही शिवत बसलेल्या
असतात.)
माधव: मी माझ्या परिचयाच्या तिथे असलेल्या मित्राला एक पत्र लिहिले होते, त्याचे पत्र आले आहे.
सासुबाई: काय लिहिले आहे त्याने पत्रात.
माधवी: मोठ्याने वाचुनच दाखव, म्हणजे मला आणि सर्वांनाच कळेल काय त्याने कळवले आहे.
माधव: सप्रेम नमस्कार.
माधवी: अरे इतके सविस्तृत वाचन करू नकोस. एकदम मुद्द्यावर ये.
माधव: तुला ( म्हणजे मला) हवी असलेली माहिती अशी आहे. तुला ऑफिसचा क्वार्टर मिळणार आहे तेव्हा जागेचा
प्रश्न तुझा सुटलेला आहे. आता प्रश्न मुलांचा.
सासरे: आणि हा प्रश्न मोठा महत्वाचा आहे. आणि याबद्दल त्याने काय लिहिले आहे याबद्दल आम्हाला उत्सुकता
आहे.
सासुबाई: तुम्हाला मध्ये मध्ये पचकण्याची सवय आहे. जरा धीर धरा. जावईबापु पत्र वाचताहेत ना?
सासरे: वाचा वाचा आम्ही आता मध्येमध्ये पूर्वी ‘व्यत्यय नावाचा कार्यक्रम दूरदर्शनवर यायचा तसा मध्ये खंड
आणत नाही. माधवी: तुम्ही दोघे जरा शांत रहा, आम्ही गेल्यावर दुसरा काही कार्यक्रम नसल्यामुळे मग दिवसभर
भांडत बसा,म्हणजे अन्नही पचेल आणि वेळही घरबसल्या जाईल.
सासुबाई: अग, हल्लीचे दूर्दर्शनवरचे कार्यक्रम आम्हा जुन्या लोकाना आवडत नाहीत. वय झाल्यामुळे जास्तीवेळ
वाचताही येत नाही.
सासरे: नाहीतर काय, पार्श्वभाग उडवत केलेले नंगेनाच आणि अर्थहीन माधुर्यहीन गाणी ऎकुन आणि बघुन डोळे
कोण बिघडवणार, आणि पेपर मध्ये वाचायला हल्ली असते काय. जाहिरातींमधुन जागा मिळाली तर बातम्या
असतात आणि त्यासुद्धा खप वाढण्यासाठी खुनांच्या व अत्याचाराच्या.
सासुबाई: अहो तो माधव कधीचा आपले भांडण कधी संपते आणि पत्र वाचुन कधी दाखवतो याची वाट बघतो आहे.
आता अळीमिळी आणि तोंडावर बोट.
सासरे: तुझ्यातील शिक्षिका जागी झालेली दिसते आहे. माधव वाच रे बाबा पत्र.
माधव: तो पुढे लिहितो की तिथे एक समाजकार्य करणारी संस्था आहे, कांही निवृत्त पण समाजकार्य करण्याची हौस
असणारी माणसे या संस्थेचे मेंबर्स आहेत. कुठे कोणी आजारी असेल तर त्या घरात किंवा कुणी इस्पितळात असेल
तर तिथे तिथल्या रोग्याच्या नातेवाईकाना जरा उसंत देण्यासाठी ते तिथे जाऊन बसतात. माधवी: अरे वा. उदात्त
उपक्रम आहे त्यांचा. म्हणजे फावला वेळ ते सत्कार्यात घालवतात असे दिसते. इथे कुठे अशी संस्था असेल तर असे
कार्य करायला आम्हालाही आवडॆल.फावला वेळ सत्कारणी लागेल आणि समाजसेवाही होईल. बघायला हवे.
सासुबाई: अरे पण आता पगार म्हणता नाही येणार जो ते मेहनाताना घेणार आहेत त्याला. पण मानधन जास्तच
घेत असतील.
सासरे: अग अडला हरी, गाढवाचे पाय धरी अशी म्हणच आहे. पण अशी सोय आहे हे महत्वाचे आहे
माधवी: अरे पण आपल्या दोघा मुलांचा प्रश्नाबद्दल त्याने कांही लिहिले आहे की नाही?
माधव: मला पत्र वाचुन दिलेत तर मी कांही सांगु शकेन. तुमची प्रश्नांची मेल एक्स्प्रेस कुठल्या स्टेशनावर थांबतच
नाही त्याला मी काय करणार.
सर्वजण: बरे आता आम्ही शहाण्या मुलांसारखे हाताची घडी, तोंडावर बोट घेऊन गप्प बसतो. पत्रातील पुढचा
मजकूर वाच. माधव: तिथे अशीही कांही माणसे आहेत की पाहिजे असेल तर एकट्या बाई आणि चालत असेलआणि
नितांत गरज असेल तर ज्येष्ठ नागरिक जोडपी दोघेही ही सेवा देऊ शकतात. म्हणजे तुम्ही, म्हणजे आपण,
कळवलेल्या वेळी येणार आणि आपण आल्यावर निघुन जाणार आणि ह्यांचे पत्ते, आणि दूरध्वनी नंबर संस्थेजवळ
नोंदलेले असल्यामुळे आणि यांनी पुरती खात्री करुनच नोंदणी करुन घेतलेली असल्यामुळे फसवणुक किंवा लबाडीचा
प्रश्नच येत नाही.
सासुबाई : वा, म्हणजे आमच्यासारखेच कुणी आजी आजोबा मुलांना सांभाळायला मिळाले की आमची काळजी दूर
होईल. माधवी: आणि आम्हा दोघानाही निश्चिंतपणे कामावर जाता येईल मुलांनाही आजी-आजोबांची माया मिळेल
आणि तुम्हालाही इथे सुखाची झोप येईल.
सासुबाई: देवाला गुळ ठेवते, केव्हढे मोठे माझ्या डोक्यावरचे काळजीचे ओझे हलके झाले या पत्रामुळे. देवच पावला
म्हणायचे.. सासरे: आमचीही मोठी काळजी दूर झाली. आधी हिला झोप येत नाही, त्यांत दोन दिवस तुम्ही दूर
जाता आहात आणि मुलांचे तिथे कसे होईल अशा दोन काळज्यांनी हिची झोपच उडाली होती. आणि तिला झोप
लागत नाही म्हणुन ती मला अर्ध्या अर्ध्या तासांनी किती वाजले हे विचारुन माझीही झोप उडवत होती. आता
मलाही विना व्यत्यय झोप मिळेल.
माधव: मित्राला पत्र लिहुन त्याचे आभार मानायला हवेत. हे पत्र पाठवुन त्याने आपल्यावर मोठे उपकारच केले
आहेत. माधवी: अरे पत्र तर पाठवच पण तिथे गेल्यावर त्याला सहकुटुंब सहपरिवार बोलावुन आपण पार्टीच देऊ
म्हणजे त्याची ओळख होईल आणि कांही लागले सवरले तर त्याची मदत घेता येईल.
(3)
(मुले घरात असतात. बेल वाजल्यानंतर दार उघडले जाते. माधव माधवी आत येतात.)
माधव: अरे ते आजी आजोबा कुठे गेले.
श्रुती: म्हणजे काय बाबा, तुमची गाडी बाहेर थांबलेली त्यांनी पाहिली, आम्हाला म्हणाले देखील की बाळांनो तुमचे
आईबाबा आले हां, आता आम्ही जातो. जिन्यात भेटायला हवे होते.
माधवी: गंमतच आहे. पण नाही भेटले हे मात्र खरे. आता इतके महिने झाले पण नेहमी त्यांची आणि आमची
चुकामुक होते. असे कां होते ते कळत नाही.
माधव: पण असे होते हे मात्र खरे.
माधवी: आणि इथे आल्यापासुन तुम्ही दोघेही सुधारलेले दिसता. वादावादी नाही, भांडण नाही. घर कसे एकदम शांत शांत.
माधव: मला तर वाटले की मी चुकुन दुसर्या घरातच शिरलो आहे. मला चिमटा काढुनही मी पाहिला.
श्रेया: आजी आजोबा प्रेमळ आहेत, अगदी त्या आजी आजोबांसारखे आणि गंमत म्हणजे त्या आजी आजोबांसारखेच
मधुनमधुन भांडत असतात. त्यामुळे आम्हाला दुसरीकडे कुठे आम्ही आलो आहोत असे वाटतच नाही.
श्रुती: आणि ती आजी इतकी बडबडी आहे आणि आजोबा तिच्या मानाने एकदम शांत आणि आम्ही स्वयंपाकघरात
लुडबुडलो तरीही आजी वैतागत नाही. आमच्या कलाने घेते. त्यामुळे मीसुद्धा कांहीकांही करायला शिकले आहे
श्रेया: आणि ते आजोबा म्हणे शाळेत शिक्षक होते. छान छान गोष्टी सांगतात.
श्रुती: आणि दुपारी आम्हाला झोपवताना आजी गाणी म्हणते, थोपटते आणि झोप कधी लागते ते कळतच नाही.
माधवी: अरे वा: म्हणजे या नवीन आजी-आजोबांशी तुमची चांगली गट्टीच जमली आहे.
श्रेया: आपण या आजी-आजोबांना कायमचे घरी ठेवुन घेउया का?
माधव: मला या आजी आजोबांना भेटण्याची अजुन संधि मिळाली नाही. पण आता त्यांचे एवढे गुणवर्णन ऎकुन
मलासुद्धा त्यांना भेटावेसे वाटत आहे.
माधवी: दुपारी तुम्ही सर्वजण एकदमच जेवण घेता का. कां आधी तुम्हाला जेवायला वाढतात आणि नंतर ते
जेवतात.
श्रेया: तसे आम्ही त्यांना कधी जेवताना पाहिलेले नाही. आणि जेवण पोटात गेल्यावर आमच्या डोळ्यांवर प्रचंड
झोप कोसळते. आणि आजोबा बाहेर बसलेले असतात आणि आजी आम्हाला बेडरूममध्ये घेऊन जाते आणि ती
थोपटत असताना आणि गाणे म्हणत असताना केव्हा झोप लागते ते कळतसुद्धा नाही.
माधवी: तुम्हाला उठल्यानंतर चहा करुन आजी देते असे तुम्ही मला सांगितले होते. ते चहा पितात की नाही.
श्रेया: जसे जेवताना त्यांना आम्ही कधी पाहिलेले नाही तसे चहा कॉफी, किंवा दूधही पिताना आम्ही कधीही
पाहिलेले नाही. पण आजी एकदा म्हणालेली मला आठवते आहे की ते चहा किंवा काँफी कांहीही पीत नाहीत.आजोबा
त्यावर म्हणालेले मला आठवत आहे की मुलानो चहा किंवा काँफी ही जीवनाला आवश्यक अशी पेये नाही आहेत
म्हणुन ते ती पीत नाहीत आणि त्यांनी आम्हालाही सल्ला दिला होता की त्यापेक्षा दूध पीत जावे जे पौष्टीक असते.
म्हणुन हली आम्हीसुद्धा दुपारी किंवा शाळेतुन परत आल्यावर दूधच पितो.
माधव: ही सुद्धा एक गंमतच आहे. तरीच हल्ली आम्ही विचारले तर तुम्ही सांगता आम्हाला चहा नको, दूधच दे.
माधवी तु त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करुन जातेस ना. इथे सबंध दिवस रहातात तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याची
सोय करायलाच हवी.
माधवी: अरे, आपण कांही एवढे कंजूष मारवाडी नाही की मुलांना सांभाळतात म्हणुन त्यांनी घरुन डबा आणावा.
दिलदारपणा, मनाचा मोठेपणा आपणा दोघांतही आहे. माझे आईवडिल किंवा आपण दोघेही मनाचे कोते नाही. माझा
निरोप मुलांना आजी आजोबांना नीट सांगता येणार नाही म्हणुन त्यांच्यासाठी मी एक चिठ्ठी ठेवुन गेले होते आणि
त्यात लिहिले होते की तुम्ही तुमचे घर समजुन आणि तुमच्या स्वत:च्या मुलाच्या किंवा मुलीच्या घरात रहात
आहात असे समजा आणि विना संकोच तुम्हाला जे हवे असेल ते करुन खा. तुम्ही त्या घरी जसे आपुलकीने
राहिला असतात तसे विना संकोच रहा.
माधव: वा, माधवी तुझे हे विचार लाखमोलाचे आहेत. मला तुझा अभिमान वाटतो तो तुझ्या ह्या दिलदार
स्वभावामुळे.
माधवी: मी चिठ्ठीत असेही लिहिले होते की आपली गाठभेट होत नाही. आम्ही येतो तेव्हा तुम्ही निघुन गेलेले
असता. तेव्हा तुम्हीही आमच्यासाठी एक चिठ्ठी लिहा आणि तुमचा गैरसमज होणार नसेल तर तुम्हाला किती
मानधन द्यायचे तो आंकडा त्यात काहीही मनात न आणता लिहा. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मुलांच्यात घालवत
आहात, मुले तुमचे किती कौतुक करतात ते तुम्ही भेटले असतात तर प्रत्यक्षच सांगितले असते. पण मी मुलांना
विचारले पण अजुनतरी इतके महिने झाले तरी त्यांनी तोंडी सांगितलेले नाही किंवा लेखी चिठ्ठीही लिहिली नाही.
अरे एक दिवस मी श्रुतीला आठवणही केली होती की आईने तुम्हाला चिठ्ठी लिहिली होती त्याचे तिला तुम्ही उत्तर
लिहिले नाही.
माधव: मग यांनी काय उत्तर दिले, श्रुतीला.
माधवी: अरे ते ऎकले तर तू चाटच पडशील. ते म्हणाले, अरे तुम्ही आम्हाला आजोबा आजी अशी प्रेमळ हाक
मारता की नाही, म्हणजे तुमचे आईवडिल आमची मुलं झाले आणि तुम्ही आमची नातवंडे. मग आपल्या नातवंडांना
सांभाळायचे कुणी पैसे घेतो का?
माधव : काय असे ते म्हणाले. म्हणजे एकदम ग्रेटच माणसे आहेत ही. अशी लाखमोलाची माणसे मुलांना
सांभाळायला मिळणे हेही मोठे भाग्य आहे. असे मी म्हणतो ते ते कांहीही मानधन घेत नाहीत म्हणुन नाही तर
त्यांच्या मोठेपणाचे मला कौतुक वाटते आहे म्हणुन म्हणतो.
माधवी: जाऊ दे, आपली त्यांची भेट होत नाही, ते उत्तर लिहित नाहित मग हा तिढा सुटायचा कसा. पण माधव
ज्या संस्थेकडुन ते आले आहेत त्यांना विचार ना.
माधव: त्यांना मी आल्याआल्या फोन करुन मानधनाबद्दल विचारले होते तेव्हा त्यांनी कळवले होते की
आजी आजोबा जे आम्ही तुमच्याकडे पाठवणार आहोत त्यांचा देण्याघेण्याचा व्यवहार तुम्हीच बघा. ते पैशांसाठी
मुलांना सांभाळत नाहीत तर समाजसेवा म्हणुन साभाळतात पैशांपेक्षा त्यांचा प्रेमावर विश्वास आहे. पण आदर
करावा असे हे आजी आजोबांचे जोडपे आहे. म्हणुन मी मग गप्पच बसलो आणि तुला हे बचायला सांगितले.
केव्हातरी लौकर यायला जमले तर मी बोलेन प्रत्यक्ष आजोबांजवळ. फुकट सेवेला जगात काडीइतकीही किंमत
नसते. आणि चांगले घसघशीत मानधन देण्याची आपली ऎपत आहे. तेव्हा एक दिवस मीच त्याना भेटेन .
(4)
(माधवी-माधव गप्पा मारत आहेत. )
माधवी: तुमच्या आईवडिलाना प्रत्यक्ष पहायची आणि त्यांच्याशी बोलायची वेळ आली नाही. आपले लग्न व्हायच्या
आधीच सासुबाई गेल्या आणि एक वर्ष आधीच मामंजी गेले. दोघेही नोकरी करत होते पण फार काळ निवृत्ती वेतन
घेऊ शकले नाहीत,आणि आराम करू शकले नाहीत.
माधव: हो ना, मी शेंडॆफळ आणि माझ्या मोठ्या वहिनीनेच आपले लग्न लावुन दिले.
माधवी: आपल्याकडे त्यांचा एखादा फोटो नाही का? फोटो पाहुन ते कसे दिसत होते ते मला कळले असते,आणि
तुम्ही कुणाच्या वळणावर गेला आहात ते कळले असते.
माधव: मी सुखात आहे. तुला माहिती आहे ना एक म्हण आहे ‘मातृमुखी सदा सुखी’.
माधवी: सर्वजण सांगतात मी वडिलांच्या चेहर्यावर गेले आहे. काय रे मातृमुखी सदासुखी आणि पितृमुखी काय सदा
दु:खी. दिसते का मी तुम्हाला कधी दुर्मुखलेली?
माधव: अग, गंमतीने म्हणालो. ती म्हण काही मी बनवलेली नाही आणि दुसरे म्हणजे गंमत आणि म्हण इतक्या
सीरिअसली घ्यायची नसते.
माधव: त्या आजी येतात ना त्या इतका उत्तम शिरा बनवतात. परवा तु मला ऑफिसातुन आल्यानंतर दिला होतास.
माझी आई असाच शिरा करायची. शिरा खाताना मला तिचीच आठवण आली.
माधवी: मुले आजी आजोबांवर खूष आहेत. आणि तेही मुलांचे खूप खूप लाड करतात. यायच्या पूर्वी आपण
केवढ्या काळजीत होतो. मी आईबाबांना कळवले आहे की मुले आणि आम्हीही सर्वजण ह्या जोड आईबाबांवर खूष
आहोत त्यामुळे त्यांचीही काळजी दूर झाली.
माधवी: त्या आजींच्या शिर्यावर तुम्ही खूष असणारच. किती गोड झाला होता. साजुक तुपातला आणि त्यात
वेलची,बदाम चातलेले न चांगला लागायला काय झाले? आणि तुम्ही सर्वजण गोडेच आहात आणि मुलंही तुमच्याच
वळणावर गेली आहेत आणि सर्वजण आनंदात आहात हे पाहुन मीही खूष आहे. मला मात्र तिखटजाळ पदार्थ
आवडतात. तुम्हाला गोड मला तिखटजाळ.
माधव: आवडीत विसंगती असली तरीही आपला संसार सुखाचा चालला आहे ना मग झाले तर! माधवी: काय आहे
जेवण जर नुसतंच गोड असेल तर त्याला मजा येत नाही म्हणुन तर पानात पक्वान्नांबरोबर कोशिबिर, लोणचे,
चटणी, पापड वाढले जातात. त्यामुळे जेवण रुचकर होते आणि पोटभर जेवले जाते.
माधव: आजी आजोबांवर मुले खूष आहेत आणि मुले सुखात आहेत हे पाहुन आपणही निश्चिंत आहोत.
माधवी: पण हे नवीन आजी आजोबा कसे आहेत ते पहायचा मात्र आपल्याला अजुन योग आलेला नाही.
माधव: आपण बदली होऊन आलो होतो तेव्हा केव्हढ्या काळजीत होतो. आता आपले सगळे टेंशन गेले आहे.
माधवी आपण त्या आजी आजोबांना ओझरते पाहिले आहे असे मला वाटते.
माधवी: केव्हा रे?
माधव: अग ते येणार होते त्या दिवशी आपण त्यांना भेटावे म्हणुन थांबलो होतो. मी खिडकीतुन पाहिले तेव्हा एक
आजी आजोबा मला येताना दिसले पण ते शेजारच्या विंगमध्ये गेलेले मला दिसले. मी तुला तसे म्हटलेही..
माधवी: हो मला आठवते आहे. पण आले असतील दुसर्या कुणाकडे पाहुणे म्हणुन आपण निघालो आणि
बर्वेकाकांचा फोन आला की तुमच्याकडे कुणी आजी आजोबा येणार होते का. ते आमच्याकडे शिरले आहेत.
माधव: हो ग. पण आपल्याला एक क्षणही वेळ नव्हता. तेव्हा आपणच त्यांना सांगितले की तुम्ही त्यांना घेऊन या,
मुलांशी तुमची चांगली ओळख आहेच. मुलांना सांगा की हे आजी आजोबा पाहुणे आलेले आहेत आणि आता आईबाबा
येईपर्यंत थांबणार आहेत. अशा तर्हेने ते आले, राहु लागले, मुलांच्यात रमले आणि आपली काळजी दूर झाली.
माधवी: पण त्यांची आणि आपली कधीही प्रत्यक्ष भेट घडु शकली नाही. त्या संस्थेकडुन आलेले होते, बर्वेकाकांनी
त्याना आणले आणि इतक्या दिवसानंतर ते आता आपले जवळजवळ कुटुंबियच झाले आहेत.
माधव: मीच आता मनावर घेतो आणि त्यांना एकदा भेटतोच, आणि तेही या आठवड्यातच
माधवी: प्रॉमिस. माधव:: प्रॉमिस.
(माधवी कामावरुन येते. माधव लौकर आला आहे, आजी आजोबाना पहाण्यासाठी, भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी
बोलण्यसाठी)
माधवी: आज तु त्या आजी आजोबांना भेटण्यासाठी लौकर आला होतास. भेटले का ते.
माधव: भेटले ना.
माधवी: अरे भेटले तर थांबवुन ठेवायचे ना मी येईपर्यंत. मलासुद्धा त्यांना पहायचे होते, भेटायचे होते. कां नाही
थांबवुन ठेवले नाहीस त्याना. मी तुझ्यावर फार रागावले आहे. आता तुझी माझी कट्टी.
माधव: ए कट्टीवाली अग मला संधि तरी दे कांही सांगण्यासाठी.
माधवी: आता मी चिडीचूप बसते. उघड तोंड आणि बोल भरभर.
माधव: मी तुला एक नवलपरीची गोष्ट सांगणार आहे.
माधवी: अरे गोष्ट ऎकायला मी काय कुकुले बाळ आहे, गोष्ट ऎकण्यासाठी मी आलेले नाही. आजीआजोबांबद्दल सांग.
माधव: नवलपरी त्यांच्याबद्दलच आहे.
माधवी: तसे असेल तर मग हरकत नाही. बोल माधव बोल, राजा लौकर लौकर बोल.
माधव: वा! एकदम कळी खुललेली दिसते आहे. मग ऎक.मी आधी येता येता ‘एकमेका सहाय्य करू’ या संस्थेला
फोन केला होता हे सांगण्यासाठी की निरोप ठेवुनसुद्धा हे आजोबा मानधनाचा आंकडा सांगत नाहीत आणि गंमत
म्हणजे आम्हाला कधीही भेटत नाहीत, आम्ही यायच्या आधीच नारदमुनींसारखे ते अंतर्धान पावलेले असतात. यावर
त्यांनी मला जे सांगितले ते ऎकुन मी अगदी तीनताड उडालो.
माधवी: थांब औषध आणते, कुठे फार लागले नाही ना, कारण तीनताड वर उडाल्यावर, वरच्या छप्पराला डोके लागले
असेलजखम झाली असेल, रक्त आले असेल..
माधव: तू म्हणजे एकाचे अकरा करणारी आहेस. म्हणजे ते जे कांही म्हणाले ते ऎकुन मी आश्चर्यचकित झालो.
माधवी: जरा मला समजेल अशा शब्दात सांगशिल का? एव्ह्ढे धक्कादायक काय त्यांनी सांगितले.
माधव: ते म्हणाले तुमचे शेजारी बर्वेकाका आमच्याकडे चौकशी करायला आले होते, पण
माधवी: अरे आता हा कुणाचा पण नको, बिण नको. इथे कुणाचे स्वयंवर चाललेले नाही.माझी उत्सुकता फार ताणु
नका.
माधव: ते म्हणाले आपल्याकडुन मागणी आल्यावर एक आजीआजोबाना पाठवायचे त्यांनी नक्की केले.
माधवी: मग ते येऊन गेले का, कधी, केव्हा आपल्याला काही कळले नाही. कदाचित आत्ता येतात तेच असतील.
माधव: तीच तर सस्पेन्स स्टोरी आहे. ते पाठवणार असलेल्या आजी आजोबाना कांहीतरी अडचण आली आणि
त्यांनी संस्थेला कळवले की सध्या त्याना जमणार नाही. दुसरी कांहीतरी सोय करा.
माधवी: असं कळवलं त्यांनी, मग पुढे काय?
माधव: पुढे काय, तर बैलाला चार पाय. त्यानंतर त्यांनी आपल्या फोनची वाट पाहिली आणि आपल्याकडुन फोन
गेला नाही तेव्हा त्यांना वाटले की आपण कांहीतरी वेगळी सोय केली असावी आणि म्हणुन आपल्याकडुन फोन आला
नाही,असे त्यांना वाटुन तेही गप्प बसले..
माधवी: अहो, मग आपल्याकडे येत होते ते आजी आजोबा कोण ? .
माधव: जे कुणी येत होते ते वाईट होते का ?मुलांनी कधी त्यांच्याबद्दल तक्रार केली का ? मुलांना चांगले सांभाळत
आहेत ना?
माधवी: प्रश्न तो नाही. पण अशा अनोळखी माणसांवर, ज्यांच्याबद्दल आपणाला ओम ना ठोम माहिती नाही
अशांवर आपण आपली मुले दिवसभर सोपवुन आपण किती रिस्क घेत आहोत हे तुझ्या लक्षात येत नाही का?
मला तर मुलांची काळजीच वाटायला लागली आहे.कसे वागत असतील मुलांजवळ देवच जाणे. खायलाप्यायला तरी
वेळेवर देतात की नाही.
माधव: तुझे म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे. जोपर्यंत सत्य माहित नव्हते तोपर्यंत आपण काळजी करत नव्हतो
पण् आता मात्र काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे असे वाटावे हे मात्र खरे.
माधवी: अहो, पण तुम्ही लौकर परत आला होतात आणि तुम्हाला हे सत्य कळले तेव्हा त्यांच्याकडे चौकशी केलीत
का, की ते कोण, कुठुन रोज येतात, त्यांची नांवे, पत्ता वगैरे वगैरे.
माधव: अग असा प्रश्नांचा भडिमार करू नको. मी हे सर्व कळुन देखील का शांत आहे यावरुन तर तुझे समाधान
झाले असेल.
माधवी: म्हणजे तुम्ही व्यवस्थित सर्व चौकशी केली आहे. मग मलाही त्यांचे नांव, गाव, कळेल का?
माधव: अग, तीच तर मोठी गंमत आहे. ते आजी आजोबा कोण आहेत सांगु का? ते तुझ्या नाही पण माझ्या मात्र
चांगले परिचयाचे आहेत, मग तर झालं ना?
माधवी: परिचयाचे आहेत मग ठीक आहे सांगा त्यांचे नांव.
माधव: म्हणजे तु आता मला त्यांची कुंडलीच मांडायला सांगते आहेस.
माधवी: कुंडली नव्हे, कुंडली छोटी असते, मला त्यांचा पूर्ण बायो डेटा हवा आहे.
माधव: आता तुला फार संभ्रमात ठेवत नाही. अग माझे ते.
माधवी: माझे ते,माझे ते, माझे ते काय ? अरे लौकर वाक्य पुरे कर. माझा जीव असा टांगणीला लावु नको
माधव: तुला मोठा 460 वोल्टचा धका बसणार आहे. म्हणुन तुझी मानसिक तयारी करतो आहे. माझे माझ्या पत्नीवर नितांत प्रेम आहे आणि मला माझी बायको अजुन हवी आहे ना म्हणुन जरा वेळ लावतो आहे. म्हणजे जरा ताणतणाव मनावरचा कमी होईल.
माधवी: 460 वोल्टचा धक्का मला बसणार आहे. एव्ह्ढी कसली शाँकिंग न्युज देणार आहेस.असे काय सांगणार आहेस? माझ्या संयमाचा असा अंत पाहु नकोस.. लौकर सांग. मुले बाहेर खेळायला गेली आहेत. ती आली की मला त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागेल आणि आपले बोलणे तिथेच राहील.
माधव: ऎक तर ते माझे खरेखुरे आई वडिल आहेत.
माधवी: कांहीतरीच काय सांगतोस. तुझे आई वडिल. हे कसे शक्य आहे आणि ते इथे कसे काय येऊ शकले.
माधव: ऎक, मी घरी आलो आणि काय घडले ते.
(5)
(माधव लौकर घरी आला आहे. आपल्या घरी आजी आजोबा रहातात ते कोण आहेत याबद्दल त्याला उत्सुकता आहे. बेल वाजवतो)
आजोबा: अग, बघ ग कोण आले आहे ते. कुणी कुरिअरवाला असेल. ह्या कुरिअरवाल्याना यायला कांही काळवेळ नसते. केव्हाही बेल वाजवतात. झोपलेले असलो तर उठुन जायलाच लागते कारण दरवाजा उघडल्याशिवाय बाहेर कोण आले आहे ते कळत नाही.
आजी: बघते हा. तुम्ही उठु नका, मी उभीच आहे मी बघते. (दार उघडते, माधव आत येतो)
आजी: अहो ऎकलंत का? पाहिलंत का. कोण आले आहे ते. आपला माधव आला आहे.
(माधव आश्चर्यचकित होतो)
माधव: आजी तुम्ही मला नांवासकट ओळखता. आधी आपण दोघांनीही एकमेंकाना कधिही पाहिलेले नाही.
आजी: अरे जन्मदात्री आई आपल्या बाळाला कशी आणि कधी विसरेल?
माधव: आजी तुमचा कांहीतरी गैरसमज होतो आहे. मी तुमच्या मुलासारखा दिसतो का, म्हणुन तुम्ही फसला असाल.
आजी: मुलासारखा दिसतो का असे तू विचारलेस. सारखा नव्हे तु माझा माधवच आहेस तुझा भार मी नऊ महिने वाहिला आहे, तुला अंगाखांद्यावर खेळवला आहे, आणि तू आमचे शेंडेफळ,तुला विसरणे कसे काय शक्य आहे? . माधव: मी माधव आहे हे नक्की. पण तुम्ही माझी आई कशी असू शकाल. कारण माझे आई वडिल कांही वर्षांपूर्वीच गेले, गेले म्हणजे गावाला नाही, तर कायमचे वर गेले. दिसता तुम्ही माझ्या आईच्याच वयाच्या आणि आईसारख्याही. पण माझी आई पुन्हा इथे येणे कसे शक्य आहे. मला माफ करा आजी तुमच्या म्हणण्यावर मी विश्वास ठेवत नाही म्हणुन.
आजोबा: आता माझ्याकडे नीट लक्षपूर्वक बघ. दिसतो की नाही मी तुझ्या वडिलांसारखा. आम्ही गेलो तेव्हा मोठा जाणता होतास तू. तेव्हा तू तरी आम्हाला ओळखायला हरकत नाही.
माहव: खरंच. तुम्ही दोघेही डिट्टो माझ्या आईबाबांसारखे दिसता, कार्बन कॉपी किंवा हल्लीच्या भाषेत झेरॉक्स कॉपी म्हणा तर. आणि तुमच्या बोलण्या, चालण्यावरुन मला भास होतो आहे की तुम्ही माझे आईबाबा असायला हरकत नसावी,खरे आहात की नाही हा नंतरचा प्रश्न, कारण तुमचीच नातवंडे असावीत असे समजुन तुम्ही मुलांबरोबर वागत आहात..
आजी: अरे माधवा! भास नाही, आभास नाही, तर हे पूर्ण सत्य आहे. चक्क आम्ही तेच आहोत तुझे साक्षात जन्मदाते.
माधव: पण हे कसे काय शक्य आहे.तुम्हाला वाईट वाटेल कीएवढे तुम्ही जीव तोडुन सांगता आहात आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही म्हणुन, पण हे केवळ अशक्य आहे. त्यांना अग्नी दिला दादाने तेव्हा मी हजर होतो ना स्मशानात. दुसर्या दिवशी आम्ही स्मशानातुन अस्थिही आणल्या.आणि नंतर विधीपूर्वक त्यांचे विसर्जनही केले. मग तुम्ही जिवंत कसे हे अवघड कोडे आता फक्त तुम्हीच उलगडु शकता, मंदमति माझ्या बुद्धीला कळणे हे सर्व समजुतीबाहेरचे आहे.
आजोबा: मी थोडे सोपे करुन सांगतो, पण मला वाटते माझ्यापेक्षा तुझी आईच सोप्या शब्दात सांगु शकेल.
आजी: अरे मागे मी तुला थट्टेत म्हणाले होते ना, लग्न झाल्यावर तुम्ही कामावर गेल्यावर मी आणि हे येऊ स्वर्गातुन आणि थोडेफार काम करुन जाऊ.
माधव: हो, हे मला आठवतंय आणि एकदा मी माधवीला, तुझ्या सूनबाईला जेव्हा आमची बदली झाली आणि आम्हाला इथे यायचे होते तेव्हा थट्टेत म्हणालो सुद्धा होतो की मागे आई म्हणाली होती की आम्ही येऊ, ते खरेच आले तर आपल्या मुलांकडे नातवंडांकडे मायेने बघतील आणि आजी आजोबाच असल्यामुळे आपल्याला काळजी वाटणार नाही.पण हे कसे काय शक्य झाले?
आजी: विचारतरंग आणि मनाचा वेग याबद्दल तुला माहिती आहे ना, एका निमिषात मनातील विचारतरंग इथुन भारतात नव्हे, तर सातासमुद्रापलिकडे अमेरिकेमध्येसुद्धा जाऊन पोचतात.ध्वनि लहरींमुळे नाही का आपण कितीही लांब असलेल्या नातलगांबरोबर मोबाईल किंवा फोनवरुन संभाषण करू शकतो.विचारतरंगाना अंतराची मर्यादा नाही. हे विचारतरंग थेट स्वर्गात आमच्यापर्यंत येऊन पोचले आणि मग आम्ही इथे येण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
माधव: प्रयत्न सुरु केले म्हणजे काय?म्हणजे तिथेही स्वर्गात यासाठी कांही प्रोसिजर आहे की काय?तुम्हाला अर्ज विनंत्या कराव्या लागतात की काय. गंमतच आहे.
आजोबा: अरे, अमेरिकेत गेले, तिथले नागरिकत्व घेतले की त्यांचे कायदेकानू पाळावे लागतात. तसेच स्वर्गवासी कुणी झाले की तिथले नियम बंधनकारक असतात.
आजी: अमेरिकेत जायला जशा अर्जविनंत्या कराव्या लागतात तशा स्वर्गातसुद्धा थेट प्रवेश मिळत नाही. कितीतरी चाचण्यातुन जावे लागते. तुमचे मागचे सर्व आयुष्यच तुम्ही कसे घालवले हे सर्व पाहिले जाते. ज्याना तिथे प्रवेश मिळत नाही, ते त्रिशंकू सारखे धड पृथ्वीवर नाही, धड स्वर्गलोकात नाही असे मध्येच लटकत रहातात.
माधव: म्हणजे मला कळले नाही.
आजोबा: तुला माहितच आहे की जवळजवळ तेरा दिवस आम्ही इथेच असतो. तेराव्या दिवशी कावळा पिंडाला शिवला की आम्ही जायला पूर्णपणे मोकळे होतो.
आज़ी: आम्ही जायला मोकळे होतो म्ह्णणजे इथला आमचा संबंध संपतो आणि मग.पृथ्वी म्हणजे मृत्युलोकातुन आमची सोय भूलोक आणि भुवलोक यांच्या मध्ये असलेल्या एका मर्त्यलोकात केली जाते.कांहीवेळा इथे नाही का घर कोसळले, भूकंप झाला अशा अडचणीच्यावेळी लोकांची सोय Transit camp मध्ये म्हणजे दुसरी सोय होईपर्यंत केली जाते तशी आमची रहाण्याची तात्पुरती सोय करतात. आणि मग चित्रगुप्ताच्या कचेरीत खातेवहीमध्ये आमच्या पाप पुण्याची नोंद पाहिली जाते. मर्त्य असलेल्या,जेजे नाशवंत आहे त्या प्रत्येकाची तिथे नोंद असते. त्या सर्वांना इथे मागच्या जन्माच्या पापपुण्याप्रमाणे सुख दु:ख भोगायला वेगवेगळ्या योनींमध्ये पाठवले जाते.आणि मागील जन्मांमध्ये त्यानी कांही पापकृत्ये केली असतील तर निदान पुढच्या जन्मात त्यांनी चांगले वागावे याची अपेक्षा असते.
आजोबा: दररोज कोटीकोटी जीव मरत असतात, त्यामुळे तिथे येणार्यांची खूप गर्दी असते.त्यांचीही रीतसर नोंद घेतली जाते.त्यामुळे हे चाळणीचे काम खूप दिवस चालते. आणि मग कार्यालयात सर्व हिशोब नीट मांडुन कागद चित्रगूप्ताकडे जातात आणि तिथे अंतिम निर्णय म्हणजे पापी, महापापी, मध्यम आणि पुण्यवान अशा चार याद्यात मृतांची विभागणी केली जाते.
आजी: तृप्त मनाने, थोर कर्तुत्वाने सदाचरणाने, निष्कलंक चारित्र्याने जेव्हा कुणाला मरण येते, कांहीही वासना उरत नाही,थेट स्वर्गात त्यांना हे सर्व पडताळुन इथल्या भाषेत व्हिसा म्हणजे वर स्वर्गात त्यांना प्रवेश मिळतो. वासना शिल्लक असणार्यांना, त्यात पुण्यवानही क्वचित असतात, त्याना पुन्हा जन्म घ्यावा लागतो तसेच बाकिच्याना वेगवेगळ्या योनींमध्ये पापपुण्याच्या प्रमाणात शिक्षा भोगण्यासाठी पाठवले जाते. थेट स्वर्गात प्रवेश दिलेल्याना पुन्हा या जन्म-मरणाच्या फेर्या माराव्या लागत नाहीत. मुक्ती असे जे नांव आहे ते मुक्त जीव सगळे कायमचे स्वर्गात रहातात आणि त्यांना जर पुन्हा विरंगुळा म्हणुन फावल्या वेळामध्ये पुण्यकर्म कराविशी वाटली तरच आमच्यासारखे मृत्युलोकात पाठवले जाते तेसुद्धा अशा तात्पुरत्या काळासाठी. नंतर आम्हाला पुन्हा परत जावे लागते.
आजोबा: स्वर्ग हे देवांचे पवित्र निवासस्थान आहे तिथे खूनी, भ्रष्ट राजकारणी, विकृत मनाच्या व्यक्ती यांना तिथे स्थान नाही, म्हणुन प्रवेश नाही. हे गुन्हेगार कायद्याला फसवुन हुषार वकिलांच्या सहाय्याने शिक्षा चुकवतात.वर लांचलुचपत नाही, भ्रष्टाचार नाही पण वरच्याना मात्र ते कदापि फसवु शकत नाहीत. वरच्याना तुमचे मन वाचता येते, क्ष किरण डोळ्यांनी ते तुम्हाला अंतर्बाह्य वाचु शकतात. गुन्ह्यांच्या शिक्षा भोगण्यासाठी वेगवेगळ्या योनीत, त्यांच्या गुन्ह्यांच्या परिमाणात पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे स्वर्ग आणि प्रुथ्वी यांच्या मध्यभाग़ी असलेल्या ठिकाणी त्याना ठेवतात.किंचितही वासना असणार्यांना स्वर्गलोक मिळत नाही.
माधव: म्हणजे विविध सुक्ष्म चाळण्यांतुन शुद्धीचा दाखला मिळाल्यानंतरच आणि त्यांच्या सर्व परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्हाला थेट स्वर्गात प्रवेश मिळाला. आजोबा: हो. आणि तिथे 35% मिळाले पास असा प्रकार नाही. संपूर्ण 100% गुण मिळाले तरच तिथे प्रवेश मिळतो. नाहीतर इथे 35 % गुण मिळतात म्हणजे तुमचे अज्ञान 65 % असते. म्हणजे त्या विषयाचे तुम्हाला निम्मेसुद्धा ज्ञान नसते. आणि तिथे आरक्षण असा भयानक प्रकार नाही. तुमचे जातपात पाहिली जात नाही. जन्माला येताना त्या जीवाला कुठे जात असते, पण ज्या घरात तो जन्म घेतो त्या कुटुंबाची त्याला जात लावली जाते. देवाघरी पंक्तीप्रपंच नाही. जिवीत व मृत अशी तिथे दोनच प्रकारात विभागणी असते.
माधव: बाबा, तुम्ही किती प्रकाराने माझ्या माहितीमध्ये मोलाची भर घालत आहात.
आजोबा: नंतर आमच्या कानी आले की तुमची कांही अडचण आहे, आणि कांही काळासाठी तुम्हाला मदतीची गरज आहे तेव्हा आम्ही देवाधिदेवाना अर्ज केला की मुलांना आमची गरज आहे तेव्हा आम्हाला तिथे कांही दिवस रोज येण्याजाण्याचा व रहाण्याचा व्हिसा मिळावा.
आजी: आणि हा व्हिसा पाच वर्षांचा आहे. तोपर्यंत मुले समजुतदार होतील, शाळेत जायला लागतील, त्यामुळे भांडणे कमी होतील व एकमेकांना सांभाळायलासुद्धा लागतील. मग कुणावर अवलंबुन न रहाता समर्थपणे आपल्या पायांवर उभी रहातील. आमचे कार्य संपले की कदाचित आधीही आम्ही परत येऊ.
माधव: मग इथुन जाता ते कुठे रहाता?आणि इथे कांहीही खातपीत नाही हे कसे? का निघतानाच एकदाच जो नास्ता करता तो दिवसभर पुरतो वय झाल्यामुळे. कारण उतारवयात भूक मंदावते?
आजी: कुठे रहातो,इथे कां खातपीत नाही, भूक मंदावते का? तुझे प्रश्न बरोबर आहेत पण ती एक गंमतच आहे. मी सांगु की तुम्ही सांगता?
आजोबा: मीच सांगतो. आम्हाला व्हिसा मिळाला आहे पण प्रवासाला विमान लागत नाही. आमची इच्छाशक्ती हेच विमानआणि विचारतरंगावरुन आम्ही अलगद,ध्वनिलहरींप्रमाणे इथे क्षणार्धात पोचतो. आमचे शरीर आत जडदेह नसल्यामुळे एखाद्या पिसासारखे हलके आहे,पण निर्जीव बाण जसा धनुष्याने गति दिली की लक्षाकडे झेप घेतो तसे हे पिस त्यात मन:शक्तीची प्रेरणा असल्यामुळे ते सरळ इथे झेंप घेते त्यामुळे त्याला कुणीही अडवु शकत नाही.. सर्व स्वर्गवासीयांना ही कला अवगत असते.
आजी: अरे, नारदमुनि नाही का, ‘नारायण, नारायण, म्हणत क्षणार्धात प्रकट व्हायचे, मग तो राजमहाल असो, दरबार असो वा शयनगृह असो आणि अंतर्धान पावायचे. थॆट स्वर्गातुन क्षणार्धात आम्ही इथे येऊ शकतो आणि तिथे पोचु शकतो.
माधव: अरे बापरे!. गंमतच आहे. ही माहिती आम्हाला नवीनच आहे. पण तुमच्या पोटापाण्याचे काय. इथे तुम्ही कांही खाल्याप्यायल्याचे आम्हाला आढळले नाही. त्याचे काय?
आजी: अरे तुम्ही आमचा देह तर जाळलात. आता दिसतो तो आमचा लिंगदेह आहे. जडदेह नाही म्हणुन पोट नाही, पोटच नाही म्हणुन भूक नाही. जगण्यासाठी अन्न लागते, आम्हाला आता मरणच नाही मग अन्नाची गरज काय आहे.
आजोबा: अरे हे पोट आहे ना ते सर्व अनर्थाचे मूळ आहे. तुमच्या पृथ्वीवर सर्वत्र अशांतता आहे ती या टीचभर पोटामुळे. पोट स्वत: तर कांहीच करत नाही. बाकीच्या अवयवांना गुलामाप्रमाणे राबवते आणि आरामात देहाच्या मध्यभागी राहुन देहावर सत्ता चालवते.
आजी: पृथ्वीवर प्रत्येकाला सत्तेचा हव्यास आहे. जो तो आहे त्यात असमाधानी आहे. दुसर्याकडे आहे त्यापेक्षा ह्याला जास्त हवे असते, कांहीही गरज नसताना.
आजोबा: एकुणएक पृथ्वीवासी माणसे असमाधानी आहेत. एकमेकांचा द्वेष करतात, उरावर बसतात आणि पण हे लक्षात घेत नाहीत की पैसा, सत्ता कांहीही वर घेऊन जाता येत नाही. रिकाम्या हाताने यायचे आणि रिकाम्या हाताने जायचे.शेवटी समाधानी काय आणि असमाधानी काय. शेवटी सर्वच माणसे मरतात.
माधव: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, गेले की तिथुन परत येता नाही आणि त्यामुळे तो आहे की नाही आणि असलाच तर तिथे कसे काय आहे हे आम्हाला कळत नाही. पण तुम्ही तर थेट स्वर्गलोकांतुन पृथ्वीलोकात आला आहात. आमच्या माहितीसाठी आणखी कांही सांगा ना.
आजोबा: मध्यंतरी मी तुला सांगितले होते की एखाद्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले आणि येण्याजाण्याचा व्हिसा मिळाला तरीही त्या देशाचे नियम पाळावे लागतात.
आजी: अरे!संसारातसुद्धा पाळायचे नियम असतात. लग्न झाल्यावर मुलीने संपूर्ण सासरचे व्हायचे असते. माहेरचे वेळीअवेळी गुणवर्णन करुन सासरच्यांचे मन कलुषित करायचे नसते आणि सासरच्या उणिवा माहेरी उगाळत बसायचे नसते. तसे आम्हाला तिथले नागरिकत्व घेतले असल्यामुळे कांही गोष्टी चारचौघात सांगायला बंधन आहे. पण जेव्हढे सांगता येईल तेव्हढे आम्ही सांगतच आहोत.
माधव: तुमचे गुप्ततेचे नियम जरुर पाळा. पण तरीही इथवर तुम्ही दोघे आला आहात तेव्हा जमले तर माझ्या कांही शंकांचं निरसन करता आलं तर करा. अर्थात नियमात बसत असेल तरच हां.नाहीतर वरचे पंतोजी,तुम्ही परत गेल्यावर तुम्हाला दम भरतील.
आजोबा: अरे तु प्रश्न विचारुन तर बघ. सांगता येणार असेल तर नक्की सांगेन. काय काय सांगायचे आणि काय नाही याची आम्हाला त्यांनी कल्पना दिली आहे. वरच्याना माहित आहेच की प्रवास करुन आल्यावरसुद्धा घरच्याना तिथे काय घडले,तुम्ही काय काय गंमत केली ती ऎकायची उत्सुकता असते आणि आम्ही तर अशा ठिकाणाहुन आलो आहोत की इथल्या पृथ्वीवासीयाना तिथले जाणुन घेण्याची उत्कंठा असणारच. तेव्हा जमेल तेव्ह्ढे आम्ही सांगुच. माधव: तुम्ही सांगितलेत की हा तुमचा लिंगदेह आहे, कारण जडदेह आम्ही जाळल्याने आता अस्तित्वातच नाही. तुम्ही आलात, जेवण जेवला नाहीत, कारण जडदेहाला भूक लागते आणि भूक लागते म्हणुन जेवण लागते आणि ह्या जेवणामुळे तो जगतो आणि जेवणामुळे त्याला आधी व्याधीसुद्धा होतात. मी म्हणतो ते बरोबर आहे ना.
आजी: शंभरटक्के बरोबर आहे. पण तुला आम्ही सांगितले आहे ते पट्ले आहे मग आता तुझी शंका नक्की काय, आहे ते तरी सांग.
माधव: तुमचा आलेला लिंगदेह,पिसासारखा हलका जवळजवळ वायुरूप आहे आणि या देहाला भूक लागत नाही हेसुद्धा खरे आहे मन:शक्तीच्या जोरावर तुम्ही थेट येऊन पोचता हे सर्व ठीक आहे.पण या पिसासारख्या हलक्या वायुरूप देहाने तुम्ही घरातली सगळी जड कामे कशी करू शकला याचे मला नवल वाटते आहे. या शंकेचे निरसन तुम्हाला करता आले आणि तुमच्या नियमावलिमध्ये ते बसत असेल तर करा.
आजी: नियम जसे असतात तसे त्याला अपवादसुद्धा असतात. अपवादांमुळेच तर नियम सिद्ध होतात.
माधव: मग लौकर या कोड्याचे उत्तर सांगा.
आजोबा: मी जे कांही सांगेन ते ऎकुन तू चक्रावुन जाशील. तुला माहित आहेच की कांही कांही पुण्यात्मे स्वर्गात सदेह जाऊ शकतात. उदाहरणार्थ आपले तुकाराम महाराज. तशीच ज्ञानोबामाउलीही सदेह स्वर्गाला गेली. इथे त्यांनी सदेह समाधि घेतली, त्यांच्या देहाला अग्नि देण्यात आला नाही आणि ते तडक या देहानिशी तिथे जाऊन पोचले. असे अनंत पुण्यात्मे वरती आहेत. जेव्हा आम्हाला इथे यायचे असते तेव्हा आम्हाला ते जडदेह इथे घालायला मिळतात. त्यामुळे लिंगदेह विचार तरंगावरून क्षणार्धात इथे पोचतो आणि मग आम्ही जसा रेनकोट अंगावर घालतात तसे आधी जडदेहावर लिंगदेह व त्वचेचे आवरण चढवतो.. त्यामुळे आमच्या लिंगदेहाला आकार येतो, आम्हाला जड वस्तू हाताळता येते. एखाद्या काठीला साडी नेसवली तर तिला आकार येतो ना तसेच हे आहे. पण ह्या पुण्यात्म्यांच्या जडदेहाला कांहीही चांगल्या,वाईट वासनाच नसतात अणि म्हणुन तर त्यांना थेट तिथे प्रवेश मिळालेला असतो.
आजी: महान पुण्यात्म्यांचे जडदेह असल्यामुळे ओतप्रोत उदारपणा, मायाममता त्यांत भरलेली असते. त्यामुळे भूतयोनीतले आम्ही असलो तरीही मनात कधिही पाप उदभवणारच नाही याची वरच्यांना खात्री असल्यामुळे ते जड देह आम्हाला तात्पुरते वापरायला मिळतात.
आजोबा: आणि जडदेह असले तरीही ते मृत झाल्यामुळे जगवण्यासाठी त्यांना अन्न द्यायला लागत नाही. रिकामी खोळ कशी असते तसे हे देह असतात.
माधव: तरीही मला एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे. तिथे असलेला जडदेह हा एका मृत व्यक्तीचा असतो. त्वचा/ लिंगदेहाच्या आंत जरी हा जडदेह,आकार येण्यासाठी तुम्ही ठेवलेला असला तरी एक गोष्ट नक्की आहे की तो जडदेह अचेतन आहे. एखाद्या काठीला साडी नेसवली तर तिला आकार येईल पण ती कांही चालू शकणार नाही.असे मी म्हणालो होतो. त्यांत चेतना कुठुन येते.मन:शक्तीमुळे तुम्ही इथवर धनुष्यातुन सुटलेल्या बाणासारखे क्षणार्धात येऊन पोचता ते ठीक आहे पण पुढे काय कारण चेतनेशिवाय हालचाल नाही आणि चैतन्याशिवाय शक्ती नाही.
आजी: हुषार आहेस म्हणजे होत्तासच म्हणुन तर लौक्रर बढती मिळुन बॅकेत आँफिसर ऎन वयात झालास. एखाद्या स्काँलर माणसाच्या मनात उद्भवाव्या तशा तुझ्या मौलिक शंका आहेत.
माधव: एकसारखा मी शंका विचारतो म्हणुन तुम्हाला राग तर आला नाही ना माझा? आजोबा: अरे शंका कुणाला येतात तर इंटेलिजंट माणसाला.
आजी: आणि वेळेवर शंकानिरसन झाले नाही तर त्या मेंदुला खात रहातात. अन्न पचन न होऊन, ते जसे पोटाला त्रास देत रहाते तसे शंकांचे आहे. मी सांगते याचे उत्तर.
माधव: सांग लौकर सांग.
आजी: हे जडदेह म्हणजे दुकानात जशा खोट्या खोट्या बाहुल्या असतात आणि त्यांच्या अंगावर वेगवेगळे कपडे घालुन ते तुम्ही घातलेत तर कसे दिसाल याचे त्या प्रात्यक्षिक करत असतात तसेच हे जडदेह तुमच्या त्या मादाम तुसाँच्या म्य़ुझियम मध्ये जसे वेगवेगळ्या महनीय व्यक्तींचे मेणाचे पुतळे पुढच्या काळात लोकाना कळावे की ती महनीय व्यक्ती दिसायला कशी होती हे कळण्यासाठी ठेवलेले असतात तसेच हे जपून ठेवलेले आहेत. इथे येताना आमच्या व्यक्तीमत्वाला शोभून दिसेल असा जडदेह आम्हाला उसना दिला जातो.
आजोबा: अग त्याच्या शंकेचे बरोबर निरसन कर. तुझी आई म्हणजे गोष्टीवेल्हाळ आहे. बाकी सगळे सांगेल पण महत्वाचे राखून ठेवील. आता मीच सांगतो पुढ्चे सगळे. तुला कळुन घ्यायचे आहे की ह्या जडदेहांमध्ये चेतना कुठुन येते. तर ऎक.
आजी: माधवा ऎक रे बाबा ऎक.
आजोबा: अशी माझी लिंक तोडु नकोस ग. आम्हाला दिलेल्या जडदेहावर जेव्हा हा त्वचा/लिंगदेह आम्ही चढवतो तेव्हा ओळख पटण्यासाठी आम्हाला आमचे जे कांही इथले रूप होते ते मिळते नाहीतर मी तुझे वडिल आणि ही तुझी आई हे तुम्हाला कसे पटणार. आता अंगात येणार्या शक्तीबद्दल. देव अमर आहेत कां, कांहीतरी कारण असणारच नाही का?.
माधव: कारण असणारच पण तुम्हा स्वर्गवासीयानाच फक्त ते माहित असणार, आणि तुम्ही सांगितलेत,उघड केलेत तरच आम्हाला कळणार.
आजी: अरे आम्ही तिथे लिंगदेहाने वावरत असतो आणि भूक नाही त्यामुळे कांहीही खायला प्यायला लागत नाही. पण आता इथे आम्हाला वावरायचे आहे म्हणजे अंगात शक्ति पाहिजे, तेव्हा जडदेहात शक्ती येण्यासाठी आम्हाला एक घोट अमृत प्यायला देतात ज्यामुळे आम्ही न दमता इथे काम करू शकतो. अमृतप्राशन करुन आम्ही इथे येतो, त्यामुळे या अचेतनदेहात शक्ती येते आणि त्या शक्तीच्या जोरावर आम्ही इथे कामेही करू शकलो. कळले का.
विषय कळण्यासाठी उदाहरण देऊ का. घरात दूरदर्शन सेट असतो, इस्त्री असते, पंखा असतो, जोपर्यंत बटन आँन करत नाही तोपर्यंत ही अचेतन यंत्रे कांहीही करू शकत नाहीत. पण बट्न आँन केले की त्यांच्यात अफाट चैतन्य संचरते आणि ती आपापली कामे चटाचट करू लागतात.त्यांच्यात जिवंतपणा येतो. तसेच आमचे आहे हा अमृताचा घोट जडदेहात चैतन्य आणतो आणि आम्ही इथे सजीवासारखे, जिवंत माणसांप्रमाणे बोलतो, चालतो, कामे करतो, वावरतो, वागतो.
माधव: वा, आई हा गूढविषय मला छान समजावुन सांगितलास. सोप्या सोप्या उदाहरणांमुळे काय सांगायचे आहे ते समजायला स्पष्ट होते.
आजोबा: शक्य होईल तेव्हढी माहिती आम्ही तुला दिली आहे. आणि माधवीलाही ही माहिती दे.ती फार हुषार आहे, तिच्या मनातसुद्धा अशा शंकाकुशंका आल्याच असतील. म्हणजे तिचेही शंकानिरसन होईल.
माधव: नक्कीच हे सर्व मी तिला समजावुन सांगेन.
(पुन्हा माधव माधवी दिवाणखान्यात गप्पा मारत बसले आहेत.)
माधव: तर असा प्रकार घडला मी घरी आल्यावर. आपण त्यांना पाहु नये म्हणुन ते आपली चाहुल लागल्यावर अंतर्धान पावत होते. तू घाबरशील म्हणुन ही हकिकत मी तुला सांगायला घाबरत होतो. कारण ते आजी आजोबा जिवंत माणसे नसुन भूतयोनीतील माझे आई वडिल होते, हे समजल्यावर तू भेदरली असतीस.
माधवी: इतके दिवस ते आपल्या घरी रहात होते. कांहीही विपरीत घडलेले नाही. पण आपण भूताखेतांच्या कथा ऎकतो म्हणुन ना म्हणुन भीती वाटते.
माधव:: अग, भूत म्हटले की आपण जाम घाबरतो इतकी धास्ती आपण या शब्दाची घेतली आहे भूत शब्दाचा साधा सरळ अर्थ आहे होऊन गेलेला पण लेखकवर्गाने यात मालमसाला घालून त्यांना भीतीदायक केले आहे असे माझे ठाम मत आहे.
माधवी: एकदम कबूल. पण आता मला पटले की मी उगाच त्यांच्याबद्दल वाईट वाईट मी मनात आणले. अरे माणसे जशी सर्व वाईट नसतात तशी भूतेही चांगली असू शकतात हे मला पटले आहे. आणि सर्व चाळण्यांमधुन पहिल्या वर्गात उत्तीर्ण होऊन,सदवर्तनामुळे स्वर्गात ज्यांना थेट प्रवेश मिळाला आहे, ते तुझे आईबाबा भूत योनीमध्ये गेलेले असले तरी ते वाईट असूच शकत नाहीत. तुम्ही त्यांना भूत म्हणा हवंतर पण ते दोघेही देवदूत नव्हे,साक्षात देवच आहेत असे मला वाटते.
माधव: बरोबर बोललीस. देवांचे जिथे वास्तव्य आहे,त्या स्वर्गात भूते नांदू शकतच नाहीत आणि जिथे अशा देवमाणसांचे वास्तव्य आहे, त्या घराला, घरातील मुलांना माणसाना भूतांची काय कसलीही भीती नसावी.
माधवी: तुझ्या आईबाबांना भेटायचा, बघण्याचा योग आलेला नाही. मला एकदा त्यांना भेटायची उत्सुकता लागली आहे. त्यांच्या सूनबाईना त्यांना भेटायची इच्छा आहे असे तू त्याना सांग. मुले मोठी झाल्यावर ते यायचे बंद होतील. कारण त्यांना त्या अटींवरच येथे येण्याचा व्हिसा मिळाला आहे. त्याआधी त्यांची माझी एकदाच प्रत्यक्ष भेट घडवुन आण, माझी शपथ आहे तुला.
माधव: वेळ आली की आपण इथुन निघुन जाण्यापूर्वी तुझी आणि त्यांची नक्कीच मी भेट घडवुन आणीन.
माधवी: तसे मी त्यांना तसे ओझरते पाहिलेले मला आठवत आहे, पण मला कसे माहित असणार की ते प्रत्यक्ष तुमचे आईबाबा आहेत. पण मी आत शिरायला आणि ते निघुन जायला एक गाठ पडली. पण आता तु त्याना जाऊन देऊ नकोस. मला वचन दे की तू त्यांना माझ्यासाठी थांबवशील.
माधव: मी वचन देतो मी त्याना मी थांबवीन आणि ते आपला अखेरचा निरोप घेण्याआधी आपण नक्कीच त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारु.
(अशीच 4-5 वर्षे जातात. मुले मोठी झालेली असतात. त्यांची पुन्हा मूळ गावी बदली होते. माधव लौकर घरी आलेला आहे. आता यापुढे आईबाबा दिसणार नाहीत या विचाराने तो बेचैन झालेला असतो. ही बातमी घरी कशी सांगावी या विचारातच तो घरी प्रवेश करतो)
आई: माधव एव्हढा उदास का आहेस. इतका चेहरा पाडुन का बसलास आहेस. कसला विचार करतो आहेस.
बाबा: अग, दुसरा कसला. आता त्यांची बदली होऊन ते पुन्हा परत जाणार आहेत, त्यांच्या तिथल्या घरी. पण आपल्याला हे कसं सांगावें या विचाराने तो हैराण झाला असणार.
माधव: बाबा, पण आजच माझी ऑर्डर निघाली आहे, मी उदासही आहे कारण आता तुमची यापुढे भेट होणार नाहीआणि आनंदातही आहे कारण आपल्या मूळ गांवी, आपल्या मुलुखात आपली भाषा बोलणार्या प्रदेशात मी परत जाणार आहे द्विधा मन:स्थितीत मी आहे.आणि माधवीचीही कांही वेगळी मन:स्थिती नाही पण तिला आपले दुरावलेले आईवडिल पुन्हा भेटणार आहेत याचाही तिला आनंद झाला आहे.
आई: अरे होणारच. पण हे तु न सांगताच माझ्या ध्यानी आलं आहे. तुमची अशी मन:स्थिती होणे साहजिकच आहे.
माधव: पण माझी बदली झाली आहे हे मी न सांगताच तुम्हाला कसं समजलं?
आई: अरे! मागे आम्ही तुला सांगितले होते की तुमच्या मनातले विचारतरंग तुम्ही एक अक्षरही न सांगता आमच्यापर्यंत तत्काळ पोचतात. टेलिपथी सारखाच हा प्रकार आहे. आम्हाला हेही कळले आहे की धाकट्या सूनबाईना आम्हाला पहायचे आहे. आम्ही तिला भेटल्याशिवाय परत जाणार नाही हे नक्की.
माधव: तुमच्या आता येरझार्या कमी होतील. इथे आल्यापासून तुमचे रूटिन डिस्टर्ब झाले होते.येरझार्या नव्हे तुमचे येथे येणेच आता होणार नाही.बाबा: त्यामुळे आम्ही डिस्टर्ब झालेलो नाही. पण तुमची आमची आता पुन्हा गाठभेट होणार नाही या विचाराने मात्र आम्ही विमनस्क नक्कीच झालो आहोत. पण हे एकदिवशी होणारच होते आणि आम्हीही आमची मानसिक तयारी ठेवलेलीच होती. जे होणार होते ते झाले मग आता त्याबद्दल वाईट वाटुन घ्यायचे कशाला? आणि आमचे इथे येणे हे नेहमीच्या आयुष्यात आपल्याला कधीकधी चेंज हवा असतोच की नाही त्याप्रकारचे होते. बाहेर आपण चार दिवस गेलो तरी रोजचे ते खरे. नोकरीत असताना दोन दिवस सुटी आली की जातातच की नाही जवळपास आउटिंगला. तसेच आम्ही हे येणे जाणे एंजॉय केले. तुला आम्ही यावे असे वाटल्यामुळे, आम्ही आलो, आल्यामुळे नातवंडे भेटली, तुम्ही भेटलात आम्ही धन्य धन्य झालो.
आई: फक्त तुम्हालाच आम्ही भेटु शकलो याचे मनात दु:ख आहे. पण तुझ्या दादाला आणि धाकट्या बहिणीला आम्ही भेटु शकत नव्हतो कारण आम्हावर कांही बंधने होती. आणि आमच्याबद्दल एक अवाक्षरही त्यांना सांगु नका असे आम्ही सांगितले होते.
माधव:पण असे कां सांगितले होते तुम्ही?
आई: तुम्हाला आमची भीती वाटली नाही. पण इतरांच्या दृष्टीने आम्ही भुतेखेतेच आहोत ना. आम्हाला घाबरुन त्यांनी तुमच्याकडे येणे जाणेच टाकले असते.
बाबा: आम्हाला फक्त तुमच्याकडेच यायचा, रहायचा, आणि वेळप्रसंगी तुम्हाला दिसायचे असा व्हिसा मिळाला होता. कांही गुपिते जपणं आवश्यकच असतं.
आई: आम्ही हे गुपित प्राणपणाने जपू, चारचौघात त्यांचा बभ्रा होऊ देणार नाही या पूर्व अटींवरच हा व्हिसा मिळाला. शिवाय आम्ही हे बंधन पाळले नसते तर वरच्यांनी आमचे इथे येणे बंद केले असते आणि ते तुम्हाला आणि आम्हालाही परवडले नसते, कारण आम्ही स्वीकारलेले हे व्रत होते आणि आता ते यथासांग आम्ही पार पाडले आहे.
बाबा: म्हणुन तर तुमच्याकडे कुणी घरचे पाहुणे आले आणि पाहुणे आले की तुम्ही त्यादिवशी घरी असणारच तेव्हा अगदी दादा किवा ताई आली तरी त्या दिवशी आम्ही मनावर धोंडा ठेवुन त्याना बघत होतो पण त्यावेळेला घरात असलो तरीही त्याना दिसत नव्हतो.
आई: अरे तीही आमची कुणीतरी लागतच आहेत ना. पण बंधन होते ना म्हणुन आम्ही अदृश्यपणे सर्व बघत होतो आणि एंजॉय करत होतो तुम्हा सर्वाना नकळत.
माधव: ते कधीचे मागे लागले होते की एव्हढे प्रेमळ आजी-आजोबा आजी आहेत तर भेटव की आम्हाला त्यांना एकदा. पण आम्ही घरी असलो की तुमची रजा आणि आम्ही जशी हक्काने रजा घेतो तशे तुम्हाला एक दिवस विश्रांती हवी म्हणुन आम्हीच उद्या आम्ही घरी आहोत तेव्हा नाही आलात तरी चालेल असा निरोप मुलांजवळ ठेवत होतो.
बाबा: अरे!तुम्ही प्रेमाने येऊ नका म्हणुन सांगत होता पण ड्युटी म्हणजे ड्युटी, इथे येणे हे व्रत होते आणि व्रताचे पालन हे प्राणापलिकडे जपुन करावे लागते, म्हणुन आम्ही येत होतो पण दिसत नव्हतो. आज मात्र आम्ही थांबणार आहोत, सूनबाईना दिसणार आहोत सूनबाई येईपर्यंत आम्ही थांबणार आहोत. नंतर पुन्हा न येण्यासाठी जाणार आहोत, पण जाण्याआधी तिला आम्हाला भेटायचाय, बोलायचाय. तिचे विचारतरंग आमच्यापर्यंत कधीच येऊन पोचले आहेत.
आई: पण गंमत सांगु तुला एकदा ती थोडीशी लौकर परत आली होती आणि तिची आणि आमची ओझरती अचानक भेट झाली. अर्थात तेव्हा मला माहित होते की ती माझी सून आहे म्हणुन पण तिला मात्र माहित नव्हते की मी तिची सासु आहे म्हणुन.
बाबा: अरे, हिच्या तोंडाला कुलूप नाही हे तुला माहित आहेच. कारण तू तिच्याच वळणावर गेला आहेस. कुठे बाहेर गेलास की तुला किती वेळ बाहेर आहेस याचे भान रहात नाही.आणि बोलायला लागलास की स्टाप नाही.
आई: पण माधवीही किती मनमोकळी आहे. अर्थात त्यावेळेला मी माझी खरीखुरी ओळख दिली नाही. आणि तिने फोटोही पाहिलेला नाही आणि आम्हाला प्रत्यक्ष भेटलेलेलीही नाही त्यामुळे आमचे हे सोंग उघडकीला आले नाही.
बाबा: पण आता ही लपवाछपवी करायची आवश्यकता नाही आहे.
(तेव्हढ्यात कामावरुन माधवी येते )
माधवी: मला माधवने सर्व कांही सांगितलेले आहे. मामंजी नमस्कार करते.(पाया पडते) सासुबाई नमस्कार करते.(पाया पडते). आता तुमची आमची पुन्हा गांठभेट होईल किंवा नाही हे सांगता येणार नाही. पण माझे सौभाग्य म्हणुन प्रत्यक्ष आजी आजोबाच मुलांना सांभाळायला मिळाले. तिथे माझे आई वडिल सांभाळत होते, इथे तुम्ही सांभाळलेत. आमची पुण्याई मोठी म्हणुन असे आमच्या आयुष्यात घडले. माधव: असे घडले हे कुणाला सांगुनही खरे वाटणार नाही.
बाबा: आणि कुणालाही सांगुही नका, कारण कुणी कुणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तेव्हा हे गुपित आहे तसेच तुमच्या आमच्यात ठेवा. आता तुम्ही जाणार म्हणुन तुम्ही चार दिवसांची रजा काढली आहे तेव्हा आता आमचे इथे येण्याचे प्रयोजन संपले आहे.आम्ही तुमची आता कायमचीच रजा घेणार आहोत.
आजी: सुखांत रहा. समाधानी रहा. आमची सर्वपित्रीला आठवण ठेवा. त्यादिवशी आम्ही वरचे सर्वजण इथे यायला उत्सुक असतो. त्यादिवशी सर्वानाच इथे यायचा व्हिसा मिळतो. पण कांही काही ठिकाणी त्यांचे स्मरणही होत नाही, भोजनही दिले जात नाही. तसे आम्ही कांही जेवत नाही हे तुम्हाला कळलेच आहेल पण एखादा पाहुणा आला तर त्याचे स्वागत आपण कांहीतरी घ्या म्हणुन करतोच. मग तो नाही म्हणाला तर गोष्ट वेगळी. पण इथे घ्या म्हणुनसुद्धा कुणी म्हणत नाही याचे फार वाईट वाटते. आपल्या मुलांचे कौतुक बघायला आम्हाला इथे येता येत नसेल पण वरुन पाहता तर येते. पण बोलावणेच नाही तर अगांतुकासारखे आम्ही इथे कसे येणार. मुलांना सांगा आम्ही गेलो म्हणुन. हे सर्व समजायला मुले अजुन खूप लहान आहेत आणि त्यांना यातले कांही समजणारही नाही आणि न समजलेले बरे. चार दिवस विचारतील की आजी आजोबा कां येत नाहीत आनि नंतर तिकडे गेल्यावर ते आजी आजोबा दिसले की त्यांच्यातच रमतील आणि आम्हाला कायमचे विसरतील. ही जगरीतच आहे त्यामुळे आम्हाला फार वाईट वाटणार नाही.
माधव-माधवी: मातृपितृ देवो प्रसन्न भव
आई-बाबा: खरतर आमचा इथुन पायच निघत नाही आहे इतकी मुलांची,तुमची, घराची सवय झाली आहे. पण गेलंतर पाहिजेच. माधवा, सूनबाई जातो हं आम्ही. आता आम्हाला खुषीखुषीने निरोप द्या. खरंतर जातो आम्ही असे म्हणावे असे आम्हीच तुम्हाला शिकवले आहे पण तो नियम पृथ्वीवासियांसाठीचा आहे. कारण आपली माणसे खूप खूप दिवस जगावी असे इथे सर्वानाच वाटते पण आम्ही तर स्वर्गवसिय आहोत, ततेव्हा जातो आम्ही असे म्हणतो. (क्षणात अंतर्धान पावतात)
माधव माधवीच्या डोळ्यातुन अश्रुंच्या धारा वहात आहेत.
माधव: हे स्वप्न होते की सत्य होते. कुणाचाही यावर विश्वास बसणार नाही, पण हे असंभव आपल्या आयुष्यात घडले खरे.
समाप्त
वासुदेव भिडॆ
(लेखनकाल : 10 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2009)
(स्थळ : बी-001, सर्वोदय धारा, पाथर्ली रिक्षा स्टँडजवळ, डोंबिवली पूर्व. ) |