प्रस्तावना मनोगत माझे कुटुंब साहित्य चारोळी
   
 
आत्मशोध
           जग हे एक विशाल रंगभूमी आहे. नाटयगृहाच्या प्रेक्षागृहात  शेकडो लोक जमलेले असतात. त्यपैकी 95 टक्के प्रेक्षक असतात व 5 टक्के कलावंत असतात. देव जगात कुणालाही जन्माला घालतो तेव्हा कांहीतरी योजुनच घालतो. त्याची कृती ही उगाचच केलेली कृती नसते. पण हे सर्व उशीरा कळते.  बाळ जन्मत:च ट्याँहा ट्याँहा करुन रडायला लागते.  पण ते ट्याँहाट्याँहा नसते तर ते विचारत असते.  कोSहम ?पहिला प्रश्न: मी कोण आहे? आणि दुसरा प्रश्न :मी इथे कशाला आलो आहे? हे ते विचारत असते.  पण जसे त्याला उत्तर माहित नसते तसेच ते त्या घरातल्यानाही माहित नसते तर ते कुठुन उत्तर देणार ? सटवी षष्ठीला रात्री येते आणि बाळाच्या कानांत सांगुन जाते की तो कोण आहे आणि त्याचा जन्म कशासाठी झाला आहे. मग बाळाला कळते की सो Sहम.आणि मग त्याची पावले तशी तशी पडत जातात,घटना घडत जातात तशा अनुषंगाने.  नाटकाचे तीन अंक असतात, ते संपायला तीन तासांचा वेळ लागतो. तसे माणसाचे आयुष्य अनेक वर्षांचे असते. कुठलीही गोष्ट घडायला वेळ लागतोच.  माणुस आपल्यालाच शोधु लागतो.

      एखादी गोष्ट आहे पण सापडत नाही तेव्हा आपण ती शोधतो.  पण आधी ती अस्तित्वात असायला हवी. तसा मी माझ्या जन्मापासुनच मला शोधत आहे. माझे सगळे जीवन हे चमत्कारिक आहे, असंभवनीय घटनांनी भरलेले आहे.  आज ही मी आत्मकथा लिहावयाला घेतली आहे दिनांक आहे 8 जून 2009, दिवस सोमवार, वेळ संध्याकाळची 5.  माझे सध्याचे वय 77 आहे. माझा जन्म एका शुभदिनी,म्हणजे महर्षि व्यासांच्या जन्मदिनी  म्हणजे गुरुपौर्णिमेला झाला.  दिनांक होता 17 जुलै 1932.  भर 2.पावसाळ्यातला दिवस. वेळ होती संध्याकाळची….म्हणजे गोरज मुहूर्त. गुरुपौर्णिमेचा जन्म त्यामुळे पाठीमागे गुरुबळ आणि गुरुकृपा भरपूर. 
मुक्काम ठाण्याचा, पण जन्म घ्यायला मात्र ठिकाण निवडले होते रत्नागिरी शहराचे.  ट्याँहा, ट्याँहा सकाळपासुनच बाळाने रड घेतली होती. कांही केल्या रड थांबेना. पोट दुखत असेल, मुंगी चावली असेल, बाळाचे आजोबा तर नामवंत होमिओपाथी डॉक्टर होते. तेव्हा त्यांनीसुद्धा रडणे थांबण्यासाठी औषधोपचार केला असणारच. पण अखंड रडण्याने त्यांच्यातील डाँक्टरलासुद्धा हात टेकायला लावले होते. आता काय करावे म्हणजे हे रडणे थांबेल कुणाला कांहीही सुचत नव्हते. ते आपल्या शास्त्रात किती निष्णात होते याची मला आईकडुन समजलेली हकिकत थोडक्यात सांगतो. ते नामवंत होमिओपाथ असल्यामुळे रत्नागिरी शहरात त्यांना प्रतिष्ठा होती.  त्यामुळे मोठ्या लोकांचे त्यांच्याकडे जाणेयेणे असे. ते गोरेपान होते. त्याकाळच्या वेषभूषेप्रमाणे, त्यांच्या डोक्यावर फेटा असे. एकदा त्यांच्याकडे तिथले सिव्हिल सर्जन जे युरोपिअन होते ते आले होते. सरकारी हाँस्पिटलात एक बाई प्रसूतीसाठी दखल झाली होती. सिव्हिल सर्जन म्हणाले की मूल आडवे झाले आहे. त्यावेळी सिझेरिअनचा शोध लागलेला नव्हता त्यामुळे ते जरा काळजीतच होते.  आजोबा म्हणाले की मी प्रयत्न करु का ? आपण तिला होमिओपाथिक गोळ्या देऊन बघुया म्हणजे प्रसूतीच्या वेळी ते सरळ होईल आणि प्रसूती नैसार्गिक होईल. होमिओपॅथिक गोळ्या म्हणजे औषधच होते, झाला तर फायदाच होणार होता.त्यामुळे ते त्या गोळ्या घेऊन गेले आणि त्यांनी त्या गोळ्या त्या बाईला दिल्या. आश्चर्य म्हणजे गोळ्याचा अनुकूल परिणाम झाला, आडवे बाळ सरळ झाले आणि त्या बाईचे बाळ नैसर्गिकरित्या जन्मले. तर असे हे माझे अजब आजोबा.   सर्व उपाय करुन झाले. पण बाळाचे  रडराग आळवणे चालूच. तेव्हा आईने  वडिलांकडे एक शंका बोलुन 3.दाखवली. तिने सांगितले की  तिचा मोठा भाऊ मागे तिच्या स्वप्नात आला होता.  हा भाऊ डॉक्टर होता आणि पोलादपुर, जि.रत्नागिरी येथे मेडिकल आँफिसर होता. रात्रीच्या वेळी पेशंटकडुन बोलावणे आल्यावरुन तिकडे विजिट देऊन परत अंधारातुन घरी येत असताना त्याला पान लागले होते.  पान लागणे म्हणजे सर्पदंश. नुकतेच त्याचे लग्न झाले होते आणि पत्नी माहेरी पहिल्या मंगळागौरीला गेलेली होती. दुर्दैव म्हणजे स्वत: डाँक्टर असून, डाँक्टरी ज्ञान असुन सुद्धा स्वत:वर कांहीही उपचार करू शकला नाही आणि त्याचे अंगात वीष भिनल्याने देहावसान झाले होते. त्याने बहिणीला म्हणजे आमच्या आईला स्वप्नात येऊन सांगितले होते की मी तुझ्या पोटी जन्माला येणार आहे.  असे सांगितल्यावर एक नामवंत डाँक्टर असुनसुद्धा आणि अशा भाकडकथांवर विश्वास नसुनसुद्धा रडं थांबवण्याचा एक उपाय म्हणुन त्यांनी देवापुढे डोके टेकवले आणि नाक घासुन  सांगितले की बाळा तू जर पुन्हा रंगूच्या ( आईचे माहेरचे नांव रंगू होते, तिच्या एक बहिणीचे नांव गंगू होते आणि ती बडोद्याला देवधरांकडे दिली होती, तिसर्‍या बहिणीचे नांव काशी होते, आणि तिला केळ्याला, रत्नागिरीच्या एका खेडेगावात बाळू बापट म्हणून होते त्यांच्याकडे दिलेली होती आणि चौथी बहिण होती तिचे नाव इंदू होते, तिला गुजराथेत बडोद्यालाच पेठ्यांकडे दिलेले होते, तीन भाऊ होते, त्यापैकी एक वासुदेव ज्याची कहाणी सध्या सांगतो आहे, दुसरा कृष्णाजी किंवा त्याला नानामामा म्हणत आणि तिसरा भाऊ होता त्याचे नांव विठ्ठल, हा त्याकाळी टाँयफाईडवर रामबाण औषध निघाले नव्हते म्हणुन अकाली त्याचे निधन झाले, तर अशी ही मूळ सहा भावंडे पण नंतर तीन बहिणी आणि एकच भाऊ जिवंत राहिले ) पोटी जन्माला आला असशील तर तुझे नांव आम्ही बाळाला ठेवू, पण आता तू रडणे थांबव. चमत्कार म्हणजे एवढे शब्द आजोबांनी उच्चारले आणि रडणारा बाळ शांत झाला. म्हणुन माझे अधिकृत पाळण्यातले नांव ‘वासुदेव” 4.आणि टोपणनांव ‘मधुकर मधु असे आहे.  यावरुन एक गंमत सांगतो, माझे लग्न ठरले तेव्हा लोकांनी आईला विचारले की मधु म्हणुन तुम्हाला दुसरा मुलगा आहे का, कारण लग्नपत्रिकेत वासुदेव असे नांव आहे.  तेव्हा मी जो आहे तो माझा दिवंगत मामा वासुदेवही  आहे आणि त्याचा भाचा वासुदेवही आहे. म्हणजे हा आजोबा आणि आईची साक्ष असलेला माझा पुनर्जन्म आहे.  अर्थात हे मला आईनेच सांगितले आहे म्हणुन मी ठामपणे हे विधान करत आहे. या वासुदेव नांवाने पुढे आमच्या घरांत मोठा वाद झाला.  आमच्या आत्याबाई गं.भा.वेणुताई भिडे( पाटणकर कुटुंबात त्या लग्न होऊन गेल्या होत्या आणि नंतर बालविधवा होऊन परतल्या होत्या).या माझे नांव वासुदेव ठेवले आहे हे ऎकल्यावर संतापल्या होत्या. त्या म्हणाल्या ह्याचा काका वासुदेव अजुन जिवंत आहे मग याचे नांव वासुदेव कसे ठेवले? त्यांना मग सर्व कहाणी सांगितल्यावर त्या शांत झाल्या.    वासुदेव हे श्रीकृष्णाचे नांव आहे. वसुदेवाचा मुलगा तो वासुदेव, कुंतीचा तो कौंतेय आणि राधेचा तो राधेय. ज्याचे जसे सर्व जीवन चमत्कारांनी भरलेले आहे तसेच माझेही आहे.  ओघाओघाने हे चमत्कार आत्मशोधात येतीलच.    मी कांही महिन्यांचा असताना आई कुठेतरी समारंभाला गेली होती. सकाळी आंघोळ झाल्यावर अंगावर पांघरुण घालुन झोपवुन ती इतर बायकांबरोबर स्वयंपाकघरात  काम करत होती बाहेर वरच्या फळीवरचा डबा काढायला एक बाई स्टुलावर चढली आणि जड डबा तिच्या हातातुन सटकला आणि डबा उघडुन आतील सर्व धान्य खाली बाळाच्या अंगावर सांडले. बाळ त्या धान्याखाली गाडला गेला; घरात हल्लकल्लोळ झाला. आई तर मोठ्याने रडायला लागली. तिला वाटले की सर्वनाश झाला, बाळ गेला. कितीतरी शेर (त्यावेळी रत्तल, शेर अशा मापात धान्य मोजले जायचे ) 5.धान्याखाली गाडलेले बाळ कसले जिवंत रहाते, श्वास घुसमटुन गेलेलेच असेल. वरचे धान्य हलक्या हाताने बाजुला केले गेले. 
   बाळाच्या नाकातोंडात धान्याचा एक कणही गेलेला नव्हता. देवदयेने   बाळ सुखरूप होते. डब्यातले धान्य उधळले गेले होते पण भरलेला डबा अंगावर पडला नव्हता ही मोठी सुदैवाची गोष्ट होती.  देव तारी त्याला कोण मारी ही म्हण खरी ठरली होती.
     आम्ही चार भावंडे, मी मोठा, नंतर माझी बहिण सुशिला म्हणजे मालती.  माझे टोपण नांव मधु म्हणुन तिला मालती म्हणत.  आईला मधुमालतीची फुले फर आवडत असत म्हणुन तिने आम्हाला ही टोपण नांवे ठेवली होती. भावंडाबद्दल खास लिहावयाचे झाले तर असे सांगता येईल ,  मी जन्मापासुनच व्रात्य.  सुशिला शांत इतकी शांत की आईने तिला एका जागेवर ठेवले, आणि इथुन हलायचे नाही मी परत येईपर्यंत, तर ती तिथे डिंक चिकटवल्यासारखी बसे, एक इंचही त्या  जागेवरुन हलत नसे.  मी पळपुटा म्हणुन मला गुराना बांधुन ठेवतात तसे दोरीने बांधुन ठेवत असत.  आणि घाण्याचा बैल जसा गोलगोल पण एकाच जागी फिरतो  तशी माझी अवस्था व्हायची.  मोकळा सोडला की हमखास गायब. म्हणुन ती माझे माकड किंवा बैल करत असे.  नंतरचा वसंता म्हणजे भाऊकाका हा आमच्या घरात सर्वांत प्रकृतीने उत्तम. त्याचे खाणेसुद्धा प्रकृतीनुसार होते. पण याची झोप म्हणजे कुंभकर्णी होती. त्यामुळे आम्ही सर्व उठल्यावर त्याला काँटखाली झोपायला देत असू. कॉटवर चादर घातल्यावर खाली कुणी झोपले आहे हे कुणाला कळत नसे आणि त्या कुंभकर्णाची झोपही पुरी होत असे. चौथा अरविंदा.  हा जुळ्यातला. झाला तेव्हा असे वाटले की हा जाणार आणि जुळी मुलगी प्रकृतीने चांगली होती. झाला तेव्हा एखाद्या ऋषिमुनीप्रमाणे त्याला दाढीमिशा होत्या. मागच्या जन्मी कुणी ऋषिमुनी असल्यामुळे (त्याने येतानाच हे सिद्ध केले होते) त्याचे नशिब बलवत्तर निघाले.  तो जाता जाता जगला आणि ती 6.वाढता वाढता संपली. मुलगी अंगाने चांगली गुट्गुटीत होती आणि हा जुळ्यातला म्हणजेच अर्धा, एकदम अंगाने दुर्बळ. कितीतरी दिवस उभाच रहात नव्हता.  आईला  फार वाईट वाटत असे की हा कधी उभा राहिल का, का असाच खुरडत खुरडत रांगणार. आम्ही बाळपणी जयंतीलाल वाडीत, लालबाग, तलावपाळी येथे भाडयाच्या जागेत(त्यावेळी रु.9 भाडे होते) रहात होतो. जयंतीलाल शेटचा बंगला आणि आमची चाळ यांच्यामध्ये प्रशस्त मोकळी जागा होती. आमच्या घरापुढे अंगण होते आणि त्यापुढे ही मोकळी जागा. दिवाळीत शेण आणुन अंगणाची जमिन चोपण्याने चोपत असत आणि चांगली  गुळ्गुळीत करत असत. तिथे आम्ही दिवाळीत रांगोळ्या काढत असू. आणि रंगवत असू. सकाळच्या कोंवळ्या उन्हात ते अरविंदाला घेऊन उन्हात बसत असत. अरविंदाच्या पायात जोर यावा, उभे रहाण्याची ताकद यावी म्हणुन जाड बेडयांसारखे वाळे घातलेले होते. कुठले कुठले तेल लावुन मालिश करत असत.  त्यांनी आपल्या या शेंडेफळासाठी खूप खूप मेहनत घेतली आणि या शेंडेफळानेही वडिलांच्या उत्तर आयुष्यांत त्यांने आणि त्याच्या पत्नीने त्यांची खूप सेवा केली.  आम्ही तर वेगळे झालो होतो, आणि त्यांच्याजवळ वडिल आणि आई मरेपर्यंत रहात होते.  नानाकाकाचे तर ते वडिलच होते पण आपल्या सासु-सासर्र्‍यांची तिने आपल्या वडिलांप्रमाणेच सेवा केली.  आजच्या काळांत हा गुण दुर्मिळ आहे   वडिलांच्या मेहनतीला यश आले . या केलेल्या प्रयत्नांचा सुयश आले, उशिरा कां होईना तो पायांवर उभा राहुन चालायला लागला आणि आता तो इतका चालतो की वाहनांचा म्हणजे रिक्षा आजच्या काळातील लोकप्रिय परवडणारे वाहन याचा उपयोग अगदी जाणे जास्त लांब असेल तरच तो रिक्षाने जातो.  नाहीतर आपली दोन पायांची बिनपेट्रोलची गाडीच तो वापरतो.त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले.     आमचे वडिल शाळामास्तर तेही प्राथमिक शाळेतले त्यामुळे 7.आर्थिक परिस्थिती बेताचीच.  आमच्या आईला एका गोष्टीचा फार राग यायचा. तिचे वडिल नामवंत होमिओपाथ, त्यामुळे त्यांची रहाणी जरा उच्च दर्जाची होती. शिवाय ते होमिओपँथीची प्रक्टिस करण्याआधी नोकरी करत असत.  त्यावेळी ते गिरगावातल्या सोमण बिल्डिंगमध्ये रहात असत, नंतर ते रात्नागिरीला स्वत:चे घर बांधुन तिथे रहावयाला गेले. त्यामुळे त्यांना पेंशनही मिळत असे. त्यामुळे सांपत्तिकस्थिती चांगली होती. आपण डाँक्टरची मुलगी असुनसुद्धा आपल्याला एका शाळामास्तरच्या गळ्यात बांधले याचे तिला फार वाईट वाटत असे.  एक्दा आम्हाला हे तिने ऎकवले. असे असले तरी तिने नंतर त्यांचा द्वेष किंवा राग राग केला नाही.तिच्या मनांत हे खुपत असे याला एक सबळ कारण होते. लग्नापूर्वी ती गिरगावात सोमण बिल्डिंगमध्ये रहात असे. तिची शाळा जवळच होती. तिच्या दोन मैत्रीणीसुद्धा लग्नानंतर ठाण्यालाच रहायला आल्या होत्या, आणि तिचे त्यांच्याकडे येणेजाणे असे.  त्यापैकी एकीच नांव होते सौ.लक्ष्मिबाई कर्वे (पूर्वाश्रमीची तिचे नांव होते सुंदरी आगरकर). हिचा नवरा मोठा कंत्राटदार होता आणि त्याचा धंदाही जोरात चालत असे.  तेव्हा तिच्या अंगावर कितीतरी शेराचे सोन्याचे दागिने होते. ते सगळे दागिने घालुन ती आमच्या आईकडे येत असे, आणि श्रीमंत असल्यामुळे येताना तिच्याबरोबर एक मोलकरीण असे आणि उन्ह लागु नये म्हणुन ती आपल्या मालकीणीच्या डोक्यावर छ्त्री धरत असे. तिह्या मनात त्यावेळी पाप म्हणजे आपल्या गरीब मैत्रीणीला हिणवण्याचे की बघ मी कशी सुस्थितीत पडली आहे आणि मोठ्या जागेतही रहात आहे आणि माझ्या घरी किती नोकरचाकर आहेत, घर कसे भरलेले आहे, कां हे मनात न ठेवता ती साध्या सरळ भावाने मैत्रीणीला भेटायला येत असे  देवच जाणे .पण आईला कधीही तिचा हेवा वाटला नाही. ज्याच्या जे नशिबात असते तेच त्याला मिळते असा तिचा ठाम विश्वास होता. तशी दुसरीही मैत्रिण तिचे सासरचे नांवही लक्ष्मिबाई 8.होते, आडनांव व मूळचे नाव मला आठवत नाही. ही ही सुस्थितीत होती. तिचा नवरा आँफिसमध्ये मोठ्या जागेवर होता, आणि म्हणुन घरची परिस्थितीही चांगली होती.  हिचा स्वभाव वेगळा होता आणि तने आपल्या थोड्याशा कां होईना श्रीमंतीचा कधी बडेजाव केला नाही. या दोघींचेही सासरचे नांव लक्ष्मी होते.  ही लक्ष्मी मोठी चंचल असते. मनात असते तोपर्यंत ती रमते आणि मन फिरले की त्या घराकडे पाठ करुन ती खुशाल निघुन जाते.  इथेही दोघींच्याकडे तिने हाच खेळ खेळला.  पहिल्या सौ.लक्ष्मीबाईंच्या नवर्‍याला धंद्यात कुठेतरी खोट आली धंदा बुडाला आणि त्याने धंद्यासाठी घेतलेले कर्ज त्याला फेडता येईना. सावकारांनी त्याच्यावर कोर्टात खटले दाखल केले आणि रहायचे घर विकायची वेळ आली, दागिनेही विकावे लागले. शेवटी कर्ज फेडता येईना  नादारी स्वीकारावी लागली.  मी कोर्टात होतो तेव्हा हा प्राणी रोज कोर्टात येऊन बसे कारण नादाराने रोज हजेरी लावली पाहिजे असा नियम होता. बघता बघता सौ.लक्ष्मिबाई कर्वे, लंकेच्या पार्वती झाल्या. मग छोटी वन रूम किचन जागेत राहु लागल्या.  पण कांही वर्षानी त्या जागेचे भाडे थकवले म्हणुन घरमालकाने त्याना रस्त्यावर काढले. त्यातच त्यांच्या त्या अभागी पतीचा देहात झाला. मग ती जागा सोडुन त्या एका पत्र्याच्या खोलीत रहु लाअगल्या आणि त्यावेळी संजय निराधार योजनेखाली रु.60/- मिळत असत त्यावर त्या गुजराण करु लागल्या. अशा त्या गडगडत खाली आल्या.दुसर्‍या सुद्धा लक्ष्मीबाईंच होत्या, त्यांची पूर्ण नांव सौ लक्ष्मीबाई दातार, त्यांचे सुद्धा नशिब लग्न होईपर्यंत चागले आणि नंतर मात्र प्रारब्धामुळे म्हणा किंवा कशामुळे माहित नाही पण  गांडू निघाले.  त्यांना भरपूर मुले झाली पण एकही जगले नाही. एकदा तर वाईट गंमत झाली.  आई त्याना भेटायला   गेली होती, तिला कळले होते की त्यांना मुलगा झाला आहे म्हणुन आणि दुर्दैव म्हणजे त्याच दिवशी त्यांचा तान्हा मुलगा गेला होता. 9.त्यांच्या नवर्‍याचे सुद्धा अकाली निधन झाले. यांची सुद्धा नौपड्याला मोठी जागा होती, शिक्षण नाही, दुसरा आधार नाही मुले झाली पण ज्याने दिली त्यानेच ती परत नेली. शेवटी त्यांना घरमालकाने खूप दिवस  वाट पाहुन यांनाही घराबाहेर काढले.पतिराजानी मोठ्या प्रेमाने आपल्या पत्नीचे नांव लक्ष्मी ठेवले होते, पण या नावाने त्यांना किंवा त्यांच्या पतिराजाना यश दिले नाही,त्यांचे दुर्दैव दुसरे काय म्हणणार.   दोघा लक्ष्मींची अशी वाताहत झाली. एकीला थोडा श्रीमंतीचा अभिमान होता, दुसरीला नव्हता पण दोघींच्या नशिबात अखेरीस फार वाईट दिवस आले. दोघींच्याही घरात मी गेलेलो आहे, कारण आमच्या घरी हळदीकुंकू असले की बोलावण्याचे काम माझ्याकडेच असे. दोघीही येत असत पण एक दागिन्यानी  नटूनथटुन आणि मोलकरणीला बरोबर घेऊन तर  तर दुसरी साधेपणाने येत असे.  एक्दा तर मला या पहिल्या लक्ष्मीबाई,त्यांच्या परिस्थितीत आमुलाग्र बदल झाल्यानंतर  देवळात भेटल्या होत्या, अंगावर जाडीभरडी वस्त्रे, मला गयावया करुन दीनवाण्या आवाजात  म्हणाल्या मधु माझ्याकडुन उदबत्या घे ना. मी त्यांना म्हटले ( खरेतर थापच मारली)की कालच मी उदबत्या आणल्या आहेत काअरान त्या ज्या उदबत्या विकत होत्या त्या अगदी हलक्या होत्या, त्यांना राँकेलचा वास येत होता. मी त्यांच्याकडुन उदबत्या विकत घेतल्या नाहीत पण त्याना म्हटले दोन पुड्यांचे पाच रुपये मी देतो ते घ्या. दयेपोटी मी हे दान देणार होतो.  आता त्याही लाचार होत्या, पुडा विकुन त्याना काय मिळणार होते ते त्यांनाच माहित. त्यांनी ते पैसे घेतले मलाही बरे वाटले.  एक वेळचे त्यांचे वैभव मी पाहिले होते, पण त्या आईजवळ कशा वागत होत्या ते मला आठवत होते.  त्यांनाही आई कधितरी सुवासिनी म्हणुन त्यांचे पति हयात होते तेव्हा बोलावत असे. तिने आपला मैत्रिणधर्म सोडला नव्हता.  तसेच दुसर्‍या दातार लक्ष्मीबाईंकडेही मी बोलावणे करायला जात असे.  अतिशय 10.चांगल्या स्वभावाच्या होत्या, त्यामुळे तिथे जायला मला कांही वाटत नसे. केव्हाही जा त्या माझ्या हातावर कांहीतरी खाऊ म्हणुन ठेवत असत, पण पहिल्या लक्ष्मीबाई आपल्याच श्रीमंतीच्या तोर्‍यात असत, तिथे मला कांहीही मिळत नसे म्हणुन मला त्यांच्याकडे जाणे आवडत नसे पण आईला हे कसे सांगणार म्हणुन निरोप्या म्हणुन मला जाणे भाग पडत असे.हे सर्व नंतर काळाच्या ओघात घडले पण आईने कधिही त्याबद्दल खेद मानला नाही.आई म्हणत असे की आधी गडगंज श्रीमंती आणि नंतर अशी दारिद्र्यावस्था कुणाच्या नशिबात येऊ नये.त्यापेक्षा तिच्या घरात जे कांही होते ते शाश्वत होते चार घांस गरिबीतल्या खाण्याचे कां असेना पण मिळत होते.कुणीही तिला घरातुन बाहेर काढणार नव्हते, कुणी घेणेकरी घेण्यासाठी तगादा लावणार नव्हते. वैभव नसेल पण जे कांही होते त्यातच ती सुखी होती, समाधानी होती आणि तिच्या पदरी एक नाही, दोन नाही, चार मुले होते की जे शाश्वतचे वैभव होते.लक्ष्मीच्या चंचलतेचा खेळ तिने पाहिला होता.तिच्या मैत्रिणीनी आडपडद्याने तिला सुचित केले होते की बघ आमचे श्रीमंती संसार बघ, आम्ही दोधीजणीना आमच्या वडिलांनी कसे श्रीमंत नवरे बघुन दिली आहेत आणि तुझ्या नशिबी मात्र आला आहे  एक भिक्कारडा शाळामास्तर, आणि तोही प्राथमिक शाळेतला, त्याला काय पगार असणार? पण तिने हे हलाहल पचवले होते आणि आपल्या नशिबात असलेल्या एका शाळामास्तरचा, असेल गरीबीचा पण तो संसार नीटनेटका आणि सुखाचा केला. मला आमच्या आईचा अभिमान वाटत असे त्यामुळे मी ठरवले होते की हिला मी कधिही दुखवणार नाही आणि माझ्या परीने सुखात ठेवीन. अर्थात मी माझा हा निश्चय शेवटपार्यंत पाळु शकलो नाही कारण माझे लग्न झाले, आणि सासु-सुनेचे कांही पटेना, कुरबुरी होऊ लागल्या शेवटी नाईलाजाने मी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. आईल तो सांगितला, तिली प्रथम वाईट वाटले पण मग तिनेच मोठे मन करुन सांगितली 11.की कडाक्याच्या भांडणानंतर वेगळे होण्यापेक्षा गोडी गुलाबीने होणे सर्वांच्याच भल्याचे आहे.
 
प्रस्तावना मनोगत माझे कुटुंब साहित्य चारोळी