गीत रमामाधवातील गीत क्र.15/31
रमा, रडतेस कशासाठी ?
भीती कसली, देव गजानन उभा असे पाठी धृ.
असंगाशी केल्याने संग,ओढवती हे असे प्रसंग
आधारास्तव घेतलेली हत्यार बने काठी (1)
गुन्हेगार नसते हत्यार,तसेच केला ज्याने वार
मारेकरी बाहुले,ही शिक्षा त्यास कशासाठी (2)
ऎकलेस जरी त्याचे नांव,बसेल धक्का,जिव्हारी घाव
कळले तरीही नांव आणता येईना ओठी(3)
दांत आपले, ओठही आपले,सजा कुणा जर कोणी चुकले
कळा सोसुनी दु:ख सहाणे हे येई ललाटी (4)
गुन्हा कुणाचा, कुणास शिक्षा,नको विषाची रमा,परीक्षा
कितिदा सांवरु, चाल चालता, काका उफराटी (5)
दु:ख रमा, नेहमी विसरावे, क्षण सौख्याचे स्मरत रहावे,
मनाजोगत्या गोष्टी घडविणे नच आपल्या हाती (6)
रक्षणकर्ता प्रभू समर्थ, म्हणुन टळला घोर अनर्थ,
ग्रहण संपले, लोचनांत कां आसवांची दाटी (7)
रमा! रडतेस कशासाठी ?
भीती कसली, देव गजानन, उभा असे पाठी. |
|