| |
मधुरामायणातील गीत क्र.45/52
अंगाईगीत गाते. स्वर अडकती गळ्यात
वाहुन सूर जाती, नेत्रातल्या जळात
येत कितीकदा रे माझ्या असे मनात
अगदी अवेळी का रे आला तुम्ही जगात धृ.
हतीवरुन साखर लुटण्यात आली असती
सारी पुरी अयोध्या हर्षात न्हाली असती
राजास पुत्र झाले परी त्यास हे न ज्ञात (1)
सारा महाल असता, ते बोल झेलण्यास
किती दासदासी असत्या,बडदास्त ठेवण्यास
फुटके नशिब तुमचे, ही वेळ साधलीत (2)
त्यागिली त्यांनी पत्नी याचे न दु:ख होई
बाळांकडे बघुन दाटून येई हृदयी
शिक्षा असे कुणाला, ती कोण भोगतात (3)
देण्याचसाठी आहे, ज्यांचा जगात जन्म
झाले परावलंबी, नियतिची गति अगम्य
लाचार आज आम्ही, आयुष्य आक्रमित (4)
वनवासी मी तयाचे, मज दु:ख होत नाही
भाग्यात हे असावे तुमच्या मनास खाई
परित्यक्त तुमची माता,व्हा तुम्ही भाग्यवंत (5)
लवकुश ही माझी बाळे, सन्मान हा जगात
कर्तृत्व दाखवून व्हा ख्यात त्रिभुवनात
सरली जुनी ती नाती, माता असे जिवंत (6)
कुठली पुरी अयोध्या, हा कोण बाई राम
ही कोण बाई सीता, कधि ऎकले न नाम
हे बाळ मी तयांची माता त्रिवार सत्य (7)
आता मी फक्त आई रत बाळपालनात
अविनाशी एक नाते, बाकी असे असत्य
बाळांस वाढविणे, स्वर्गीय सौख्य यात (8) |
|
|