|
मनाचा आरसा ज्याचा स्वच्छ
त्याला दिसेल सारे निर्मल
मनच कलुषित,प्रतिबिंब अस्वच्छ
त्याला दिसणार सारे अमंगल
शोधुनही राज्यात धर्मराजाला
सापडला नाही निव्वळ दुर्जन
शोधुन शोधुन दुर्योधन दमला
सापडला नाही एकही सज्जन
स्पर्धा प्रदर्शनात असतात निवडक श्रेष्ठ कलाकृती
एकापेक्षा एक सरस, हरपते भान, कुंठते मती
तीनच बक्षिसे दयायची, आंखलेली लक्ष्मणरेषा
स्पर्धा प्रदर्शनात बक्षिसपात्र अशा खूप कलाकृती
अप्रिय, पण व्यवहार्य, कांही काढावा लागे मार्ग
चोखंदळ म्हणून परीक्षकांची असते मोठी ख्याती
हा प्रथम क्रमांक का? याला दुसरा, तो तिसरा का? प्रश्न
रहातात अनुत्तरित, परीक्षकांनाच उत्तर माहिती
छोटी छोटी मुले,निरागस,निष्पाप
रागावतात, थोडया वेळाने फुलतात
रागावलेली, फुगलेली मोठी माणसे
डूख धरतात, मनातल्या मनात कुढतात
मुले मोठी झाल्यावर, चटक्यांमुळे
सारे चित्र बदलते, निरागसता करपते
लहानपण, निष्पापपण सर्वसर्व संपते
तेही सरावाने, मोठयांसारखेच वागते
शिस्तबदध घर, समंजस आई वडिल तशीच मुले
करुन दाखवु शकतात पुढच्या आयुष्यात कमाल
बेशिस्त घर,कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही
अपूर्व सांवळागोंधळ, शोचनीय घरातील हालहवाल
शेतात पिकणारे कडधान्य अंगामध्ये सुप्त भरपूर गुण
आडमुठा स्वभाव कठिणसाल, बचावासाठी अभेद्य ढाल
रात्रभर भिजत घालून, करता दाण्यांवरती सुसंस्कार
होता डाळिंबी, साल मऊ, धान्याची सुट्ते अलगद साल
पूर्वीचे नरभक्षक सुधारले, पण गेली नाही मांसाची लालसा
ते झाले पशु मांसाहारी, कारण सुळे, दाढा शिवशिवतात
ऋषीमुनी सुधारले,अहिंसा परमोधर्म:पशुहत्या सोडली
जीवन बदलले, अनुयायी आता शाकाहारच करतात
यमाला पडली चिंता, सर्वच मांसाहारी झाले शाकाहारी
जमवू कसे, सांभाळू कसे? जन्मम्रुत्यूचे संतुलित गणित
पशूहत्या नाही, पशूप्रजा फोफावेल, सर्व हाहाकार माजेल
मांसाहारी हवेत, नियंत्रण राहिल, जग चालेल व्यवस्थित
आपण एका हाताने कधीच टाळी वाजवू शकत नाही
टाळी वाजण्यासाठी दुसय्रा एका हाताची मदत लागते
आपला सौंदर्य आस्वाद आपण पूर्ण घेऊ शकत नाही
लोकानी वाखाणल्यावर त्याची आपल्याला जाणीव होते
फूल अत्तर स्वत:चा सुगंध स्वत घेऊ शकत नाही
हवा ग़ंधाचा सुवास सगळीकडे वहाता वहाता पसरवते
शरीर सुंदर, रतिसुख एकटा कोणी भोगु शकत नाही
ते सुख मिळवण्यसाठी, घरवालीची आनंदसाथ लागते
कुणी अकाली कुमारी कुंती माता होऊ नये म्हणुन
वयात आलेल्या मुलीना जरुर लैंगिक शिक्षण द्यावे
मुलं मुली प्रेमात पडुन मुक्त फिरण्याचा हा जमाना
लगटीनंतर मुलीने कशाला जपावे हे समजुन सांगावे
कारणाकारणाने मुले मुली एकत्र येत रहाणारच
एकविसाव्या शतकात पालकानी काळानुसार वागावे
नदीतले संथ नव्हे, कोसळत्या धबधब्यातले हे पाणी
वयात आलेल्या मुलीला मैत्रिण नात्याने समजावावे
उंदीर गिळंकृत केला, पोट भरले
सापाचा आजचा भुकेचा प्रश्न सुटला
जीवासाठी झगडणारा, पण अपेशी
जीवनमरणसंग्रामातुन उंदीर सुटला
पशूंच्या राज्यात, जीव जगवण्यासाठी
कमजोर दुसर्याला बळी जावे लागते
माणसांच्या राज्यात, दिसलं नाही तरी
प्रतिष्टेच्या बुरख्याआडुन हेच चालते
कीर्तीमान व्हायचंय, जमेल का बघा
देतो अनाहुत सल्ला
आंतरराष्टीय कीर्तीच्या कुणा व्यक्तिवर
करा अचानक हल्ला
फोटो छापुन येईल, मुलाखती घेतील
जगात होईल बोलबोला
परिणाम लक्षात घ्या, मग अविचार करा
आहात का तयार बोला?
नित्य नवनवीन कल्पनांच्या फुलानी
बहरते मनबाग, आमचा मनमळा
शब्द शब्द गुंफुन सुंदर हार बनवतो
सजतो “विरंग़ुळा स्तंभ” आमचा फळा
कधी कधी खुडतो वेलीवरची फुले
कधी कधी वेंचतो, बकुळ, प्राजक्ताचा सडा
सजग मन व डोळे, टिपत रहातात
ताज्या घटनानी भरत रहातो, जीवनाचा घडा
हुषार शास्त्रज्ञानी वापर करुन मेंदुचा
परिश्रमाने केली विविध यंत्रे निर्माण
यांत्रिक यंत्रणा कधीतरी बिघडणारच
यंत्रज्ञ,तंत्रज्ञांची फौज झाली निर्माण
ईश्वराने केले स्त्री-पुरुषमानवयंत्र तयार
सतत वापराने होतो त्यांत बिघाड
इत्थंभुत ज्ञान डॉक्टराना शरीरयंत्राचे
देतात औषध,गुण येता,चालते धाडधाड.
जाहिरातींचा हा प्रमूख उद्देश मालाची जाहिरात करणे
माल किती उत्तम,खरेदी किती फायदेशीर प्रचार करणे
प्रसंगी अतिशयोक्तीने,दुसर्यांचा धंदा अलगद हिरावणे
मुलांची मने जिंकून,ग्राहकांचा खिसा अलगद कापणे
प्रसिद्धीसाठी,वस्त्रहरणाला, नटनट्या लाजत नाहीत
सत्तेसाठी,प्रसिद्दीसाठी,नेते,लाठ्याना घाबरत नाहीत
लाजलज्जा,इमान,निष्ठा,बेशरम माणूस विकत राही
अधोगतीला जाण्यात माणसाला कुणी हरवू शकत नाही
रुग्णाला भेटायला जायला, एवढा उशीर लावू नये
अंत्यदर्शन घ्यायची पाळी, आपल्यावर येऊ नये
घरी, इस्पितळात वेळेवरच जावे,एकदा भेटुन यावे
भेटीचा आनंद,नजरानजर,धीराचे चार शब्द बोलावे
|