| |
योगासन
(1) एकाने विचारले आता पंचाहत्तर वयात
हरी हरी करायचे सोडुन तुम्ही योगाकडे कां वळलात ?
हत्ती तर निघुन गेला, थोडे शेपूट उरले
सांगा,आता तुम्ही या वयात काय मिळवणार आहात?
हत्ती गेला, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे
पण शेपटातच खूप आधि व्याधी दडलेल्या असतात
योगाने उर्वरित आयुष्य निरामय जगू
थोर शतकी वंशपरंपरा आहे आमच्या भिडे घराण्यात
एक खंवचट मित्र भेटला,म्हणाला
योगासने करतोस,अजुन काय पहायची इच्छा आहे तुला
मनात म्हटले, मी जगणार
तो जगवणार,त्यालाच विचार ना केव्हा नेणार आहे मला
मी सांगितला माझा प्लँन
नातवंडे,पंतवंडे,याचि देही याची डोळ पाहिन म्हणतो
लग्नाची मंगलाष्टके,नंतर पाळणे
बाळगाणी लिहीणे,यासाठी ठीकठाक राहीन असे ठरवतो
खंवचट मित्राची वाचाच बसली
आता भेटला, वाट बदलुन दूरवरूनच निघुन जातो
देवाने वाणी दिली,बोलावे गोडछान
वय भांडायचे नाहे,असा मी गोडगोड बोलतो
(2) जगाची अवघड गंतागुंतकोडी
मानवी बुद्धी सामर्थ्याने समर्थपणे बरी सोडवलेली
जगाची एकूण कार्यपद्धती
विशिष्ठ भौतिक नियमावलीने असते सदा बांधलेली
जीवनकोडे सुटण्यास अवघड
मन कुठल्या दिशेने चालेल नसते नियमावलि
योगामध्ये,खात्रीपूर्वक,तशीच
निस्चित आणि पद्धतशीर रीत आहे सांगितलेली
(3) गुरुची क्वचित पात्रता नसली तरी
साधकाची श्रद्धा जात नाही वांया
साधकाची नितांत श्रद्धा असते
गुरुदेव वटवृक्ष साधक त्याची छाया
सान गुरुपुढे विनम्र होताना
व्यक्तीपेक्षा मनांत असते गुरुत्वाची जाणीव
विश्वास असतो साधकमनांत
गुरुभक्तीमुळे नष्ट होईल त्याच्यातील उणीव
(4) प्रार्थना, आपण आपला
उद्धार करण्याचा आहे साधा सोपा मार्ग
प्रार्थना मनापासुन करावी
शिकण्यासाठी लागत नाही कुठलाही वर्ग
ईश्वर स्तुतिने प्रसन्न होणारा
न केल्याने राग धरणारा नाही कुणी मानव
स्वत:च्या भल्यासाठी,दुसर्याचे अकल्याण
जे जे चिंततात फक्त ते जे वृतीने दानव
(5)योगाभ्यासाने शुद्ध झालेले शरीर
अयोग्य वागणुकीने अशुद्ध करू नका
निसर्ग,आरोग्याचे हितकारक नियम पाळा
हयगय,दुर्लक्ष,शरीराला देईल धोका
योगाने जाणीवपूर्वक मिळवलेले धन
निष्काळजीपणाने वार्यावर उधळु नका
योगानुकुल जीवन सातत्याने जगा
शरीर,मन,अकारण न ताणता,वेळप्रसंगी नम्रतेने वाका
(6) सज्जनांच्या रक्षणाकरता
दुर्जनांच्या विनाशाकरता
धर्मसंस्थापना करण्याकरता,
युगानुयुगे अवतार घेतो हे भगवंताचे वचन
दुष्टांचा,वेळप्रसंगी सज्जन पक्षपात्यांचा
दयामाया न ठेवता, करतो मी संहार
प्रयत्नपूर्वक,विचारपूर्वक कर्तव्य कर
संमाहित अर्जुनाला आदेश देते गीतावचन
(7) प्रगति इछिणार्याने सतत वर वर पहात चढत रहायचे असते
अत्युच्चपदी पोचलो,आता पुरे,वाटले की मति खुलते,पण प्रगति खुंटते
अहंकार व अवाजवी आत्मविश्वास,प्रगतिमार्गातील कांटेकुटे,प्रचंड धोंडे
कर्तृत्वाने व अंगभूत गुणांमुळे,प्रतिस्पर्ध्याला हरवत,उच्चस्थानी पोचते
(8) बुद्धिमत्ता,गुणवत्ता,ग्रहणशक्ती
हमखास गुण मिळवण्याचे साधन असते
या आधारांवर,विविध परीक्षांमध्ये
प्राविण्य मिळवुन उत्तीर्ण होणे सहज जमते
जीवन कॉलेज शिक्षणच वेगळे
यशस्वी होण्यासाठी याखेरीज कांही लागते
योगाभ्यास,वाचन,मनन,चिंतन
शरीरमनसंतुलन वाट यशस्वी जीवनाकडे नेते.
(9) 'योगियांचा राणा' संतशिरोमणि ज्ञानदेव
योगासने, प्राणायाम वगैरे कांही करीत होता का?
समाजाने अव्हेरलेला, बहिष्कृत संन्याशाच्या पोराला
पोटाच्या चिंतेपुढे,मोकळा वेळ तरी होता का ?
अल्पायुषी, महाज्ञानी,या कनिष्ठ बालकाकडे
पाठीवर मांडे, रेड्याकडुन वेद,भिंतीला गती विद्या कुठुन आली ?
ज्ञानदेवांचा जन्म पूर्वजन्म पूर्ततेसाठी,
त्या जन्मातील योगसाधना,या जन्मी त्यांच्या कामी आली.
(10) कडेकपारीत,दर्याखोर्यात कुठेही केव्हाही
कधी,उंच डोंगरमाथ्यावर,झाडे,फुले कां दिसतात
जिथे कुणी पाय टाकील न टाकील
तिथे सुंदर मनोहारी फुले कां फुलतात ?
व्रत अंगिकारल्यासारखी दररोज उमलतात
नित्यनेमाने फुलतात,डुलतात,निर्माल्य होतात
कशासाठी,स्वानंदासाठी, तशीच रसिकांसाठी
फुलतात,क्षणभंगुर सुंदर जीवन सार्थकी लावतात.
(11) मानवी जीवनातील उच्चतम आविष्कार
जो आनंद आपण अनुभवतो तो स्वानंद
दुसर्यांना आनंदात पाहुन आनंद वाटतो
आपला आनंद द्विगुणित करतो तो परानंद
दुसरा दु:खी व्हावा,तसा झाला की आनंद वाटतो
त्यासाठी प्रयत्नशील रहाणे हा तामसी परानंद
आपल्यामुळे दुसरा आनंदी व्हावा,आपण आनंदी व्हावे
क्रिया,प्रतिक्रिया,योगाभ्यासाने नियंत्रित करून मिळवु योगानंद.
(12) दु:खाचा विचार करून दु:खी होण्यापेक्षा
सुखाचा विचार करून सुखी व्हावे
गुलाबाचे सौंदर्य न्याहाळताता, फुल पहावे
विद्रुप कांटे पहात कशाला हळहळावे
सौंदर्याचा आस्वाद घेताना,सुगंध हुंगताना
कांटे निसर्गदत्त ढाल,स्पर्शुन दु:खी कां व्हावे
जीवन, सुंदर फुल,कांट्यांसकट लाभले आहे
टोंचणीचे दु:ख विसरत,सुखसौंदर्यात रममाण व्हावे.
13) गुलाबकांट्याना हाताळुन,रक्तबंबाळ होऊन दु:खी व्ह्यायचे
कां लांबुन सौंदर्य न्याहाळुन सुखी व्हायचे,ते आपण ठरवायचे.
गुलाबाला संरक्षणासाठी कांटे असणारच ही वस्तुस्थिती
सहवास हवा,कांट्यांसकट स्वीकारुन वस्तुस्थितीला सामोरे जायचे
जीवन हा महासंग्राम,सुखदु:खाचे घाव झेलावे लागतात
दु:ख पचवुन,हलाहल पिऊन, आनंदाच्या झुल्यावर झुलायचे
दु:ख बाहेर उपसुन, त्याजागी पेल्यात आनंदक्षण जल भरून
अभ्यासपूर्वक वृतीने,आहे त्या जीवनात आनंदाने समरसायचे
(14) प्रसंग सुखदु:खाचे, ताणतणावाचे
आयुष्यात सतत येत रहाणार.
दत्त म्हणुन उभ्या राहिलेल्या संकटांपासुन
कुठे,कसे, किती काळ पळणार?
कधी वैयक्तिक,कधि सामाजिक
कारणांमुळे मन कायम बिथरणार
शांतपणे,समजुतदारपणे,सामोरा जाणारा
अशा परिस्थितीतही बाजी मारणार.
(15)ह्रुदयद्रावक,ह्रुदयस्पर्शी चटका लावणार्या,देणार्या
कडुगोड आठवणी,चाळुन, वेचुन मेंदू स्मरण कोषात ठेवतो
भितीप्रद आठवणी स्मरणकोषात रुतुन असतील तर
नंतर नुसत्या त्यांच्या आठवणीनीही मनाचा थरकाप होतो
आनंददायी स्मृती पुन्हा उचंबळुन वर आल्या तर
मधुर आठवणीनी माणुस,उमलतो,फुलतो,हंसतो,खिदळतो
योगाभ्यासाने विविध स्मृती नियंत्रित करता येतात
जतन (सेव्ह) केलेला हा मिश्र आनंद पुन्हा अनुभवु शकतो
(16)
श्रवणभक्ती करता करता ऎकलेले विचार
वाणी माध्यमातुन चहुंकडे पसरायला लागतात.
सुंदर सुंदर गाणी आपले मन वेधुन घेतात
संगीताच्या तुकड्यांसह तोंडामध्ये विसावतात
वक्ता बोलतो,शब्दांवर प्रभुत्व,ओघवती वाणी
श्रोते जागी खिळतात,विचारांनी मंत्रमुग्ध होतात
डोळे बघतात,दृश्यावर दृश्य टिपतात,पुसतात
कान जे शब्द टिपतात,स्मृतिकोषात जमा करतात
(17)
आसन म्हणजे शरीराची असण्याची स्थिती
या स्थितीचे प्रकार संभवतात असंख्य अनंत
चौर्यांशी दशलक्ष आसने,कदाचित अतिशयोक्ती
निश्चित एका आंकड्यांत कठिण करणे बंदिस्त
'स्थिरसुखमासनम' पतंजलिकृत सामायिक व्याख्या
अशी शरीरस्थिती जिथे,तेच समजावे आसन
पतंजलिव्याख्येत जे व्यवस्थित बसत नसेल
ग्रंथोक्त असूनही,ते ठरणार नाही योग्य योगासन
(18)
आदर्श आसनस्थितीसाठी,शारिरीक हालचाल करताना
निश्चित कांही कांही वेळेला स्नायुना ताणावे लागते
आसनात शरीरातील अनावश्यक इतर कांही स्नायुंचे
त्याचवेळी शिथिलीकरणसुद्धा करत रहावे लागते
एकाचवेळी कांही कांही स्नायुना ताण देता देता
कांहींचे शिथिलीकरण करायचे,आहे ना मोठी गंमत
सरावाने,नित्यनियमित अभ्यासाने व जाणीवपूर्वक
विचित्र उलटसुलट तंत्र जमते,वाढते,आसनातील रंगत.
(19)
विद्यार्थी म्हणुन ज्ञानप्राप्ती करताना
आपली पातळी कमी असते
ज्ञानप्राप्तीनंतर सहाजिकच
आपल्या बुद्धीची पातळी वाढते
अल्पकाळ कमीपणा घेऊन
दीर्घकाळचा मोठेपणा मिळु शकतो
ज्ञान अनंत,प्राप्तीनंतरचा अहंकार
योगप्रक्रियेद्वारा साधक टाळु शकतो.
(20)
मानव अपूर्ण,ज्ञानतृष्णा भागवण्याच्या दृष्टीने
पूर्णत्वाजवळ जाण्याचा प्रयत्न करणार
सर्वज्ञ,सर्वशक्तिमान,स्वयंभू परमेश्वराखेरीज
अखिल ब्रह्मांडात पूर्ण कुणीही नसणार
पूर्णत्वाकडे जाण्यासाठी,ज्ञानवृद्धी करण्यासाठी
आपल्या अज्ञानाची,अपूर्णत्वाची जाणीव हवी
वय,दर्जा विसरून विद्यार्थीभावनेने,नम्रतेने
ज्ञानहग्रहणाची,शिकण्याची,मनामध्ये ओढ हवी. |
|
|